Who is Yogesh Sawant – योगेश सावंत या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात योगेश सावंत हे नाव पुढे आलं आहे. विधानसभेत व विधानसभेबाहेर आज सत्ताधारी व विरोधकांमध्ये योगेश सावंत या नावावरून बरेच खटके उडाल्याचे पाहायला मिळाले.
ज्या नावाची इतकी चर्चा होत आहे, तो योगेश सावंत नेमका कोण आहे हे जाणून घेऊ…
योगेश सावंतने नेमकं काय केलं? | Who is Yogesh Sawant
योगेश सावंत या युवकाने फेसबुकवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये बोलणारा इसम, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मातीत गाडण्याची भाषा करत आहे. तसेच ब्राम्हण समाजाला संपवण्याचे आक्षेपार्ह्य विधान देखील त्याने या व्हिडिओमध्ये केलं असल्याचं दिसतंय.
हा व्हिडीओ योगेश सावंत नावाच्या युवकाने फेसबुकवर प्रसारित केला आहे. व्हिडीओ प्रसारित केल्याने योगेश सावंत याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फडणवीसांना धमकी देणाऱ्याचा शोध सुरु
एका युट्युब चॅनलला मुलाखत देताना या इसमाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या इसमाचे नाव अद्याप समोर आले नसून त्याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी याप्रकरणात निनावी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याचा शोध घेऊन अटक करण्यात येईल असं म्हंटलंय.
योगेश सावंत याला हाच व्हिडीओ फेसबुकवर प्रसारित केल्याच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे.
शिवसेना नेत्यामुळे प्रकरण उजेडात
याबाबत सांताक्रूझ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना (शिंदे) नेते अक्षय पनवेलकर यांनी याबाबत तक्रार दिली होती. पनवेलकर यांना हा व्हिडीओ सोशल मीडियावर आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी योगेश सावंत याला अटक केली आहे.
आयपीसी कलम 500 (मानहानी), 505(3) (प्रक्षोभक वक्तव्य), 506(2) (धमकी), 34 (सामान्य हेतू) आणि 153-ए (गटांमधील शत्रुत्व वाढवणे) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
विधानसभेमध्ये गदारोळ | Who is Yogesh Sawant
भाजप नेते आशिष शेलार, राम कदम यांनी योगेश सावंत याचे राष्ट्रवादी काँग्रेसोबत कनेक्शन असल्याचा दावा केला. राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी योगेश सावंत याच्यासाठी पोलीस निरीक्षकाला फोन केल्याचा गंभीर आरोप देखील सभागृहामध्ये करण्यात आला.
रोहित पवार यांचे स्पष्टीकरण
योगेश सावंत हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याची रोहित पवार यांनी जाहीर कबुली दिली आहे. सावंत याच्यासाठी पोलीस निरीक्षकाला फोन केल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. त्याला भेटण्यासाठी जाणार असल्याचे रोहित पवार म्हणालेत.
व्हिडिओमध्ये बोलत असलेल्या इसमाला अद्याप अटक करण्यात आली नाही. व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्याला अटक करण्यात आली असल्याकडे रोहित पवार यांनी बोट दाखवले.