- उपमहापौर निवडणुकीवरून चर्चा रंगली
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत अवघ्या वर्षभराच्या कारकिर्दीत उपमहापौर पदाला प्रतिष्ठा मिळवून देत महापालिकेत ‘बाहुबली’ बनलेल्या उपमहापौर तुषार हिंगे यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींना अंधारात ठेवून घेण्यात आला. हा राजीनामा घेऊन ‘बाहुबली’ बनलेल्या तुषार हिंगे यांना अडचणीत आणणारा ‘तो’ कटप्पा कोण, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. भाजपामध्ये उपमहापौरपदासाठी चुरस रंगली असली तरी अंतर्गत वाद, गट-तट आणि कलह यासारखे प्रकार उपमहापौरांच्या निवडीवरून समोर आले आहेत.
येत्या शुक्रवारी (दि. ६) उपमहापौर पदाची निवडणूक होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. या पक्षाच्या प्राबल्यामुळे सर्वच्या सर्व पदांवर याच पक्षाचे नगरसेवक आहेत. जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी महापौर आणि उपमहापौरपद हे सव्वा सव्वा वर्षानी बदलण्याचे या पक्षाचे धोरण आहे. त्यानुसार पहिल्या अडीच वर्षांत या दोन्ही पदांवर चार जणांना संधी मिळाली. तर उर्वरित अडीच वर्षांमध्ये चार जणांना संधी देण्याचे धोरण आहे. मात्र सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच उपमहापौर तुषार हिंगे यांचा राजीनामा स्थानिक नेत्यांनी घेतला. हा राजीनामा घेताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने राजीनामा घेतला जात असल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र, काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील शहरात आले असता तुषार हिंगे यांचा राजीनामा घेतल्याबाबत त्यांना कल्पनाच नसल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचे नाव पुढे करून स्थानिक पातळीवरील एका नेत्याने हा राजीनामा पालिकेतील एका पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजीनामा घेण्यासाठी “कटाप्पा’ची खेळी करणारा तो नेता कोण? अशी चर्चा पालिकेत रंगली आहे.
विशेष बाब म्हणजे तुषार हिंगे यांनी आपल्या अवघ्या एक वर्षाच्या कार्यकाळात उपमहापौर या पदाला चांगलेच वलय प्राप्त करून दिले होते. तुषार हिंगे यांचे वाढलेले महत्त्व स्थानिक नेत्यांमधील काहीजणांना खूपत होते. तर सध्या पदावर असलेल्या काहीजणांच्या “दुकानदारी’ला ते अडथळा ठरत असल्यामुळेच हा राजीनामा घेतल्याचेही सांगितले जात आहे. तुषार हिंगे यांनी राजीनामा दिल्यामुळे आता 6 नोव्हेंबर रोजी नव्या उपमहापौरांची निवड होणार आहे. या निवडीवरून भाजपातील अंतर्गत कलहही समोर आला आहे.
भोसरी, चिंचवड आणि निष्ठावंतांना या पदावर आपल्याच गटाच्या नगरसेवकाला संधी द्यावयाची आहे. त्यामुळे चांगलाच अंतर्गत कलह निर्माण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. सध्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांना मानाचे स्थान महापालिकेत नाही. पिंपरीतील नगरसेवकाला संधी मिळावी यासाठी निष्ठावंत आग्रही आहेत. तर भोसरी आणि चिंचवडकर आपल्याच मतदारसंघातील नगरसेवकाला संधी देण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे या पदावर कोणाची निवड होते हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीचाही उमेदवार
उपमहापौर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला शिवसेनेचा आणि मनसेचा पाठिंबा मिळू शकतो. भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यास तसेच नगरसेवक अनुपस्थित राहिल्यास राष्ट्रवादीला लॉटरी लागू शकते. मात्र भाजपाचे सध्याचे संख्याबळ आणि स्थानिक आमदारांची नगरसेवकांवर असलेली पकड पाहता उमेदवार कोण? यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.