मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त भेट घेतली आहे. वडिलकीच्या नात्याने पुतण्याची भेट घेतली, असे स्पष्टीकरण शरद पवारांनी दिले. मात्र, या भेटीमुळे शरद पवारही सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. दरम्यान, या सर्व घडामोडीत आता खुद्द शरद पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यातही त्यांची पहिली सभा धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात होणार आहे. त्यावरूनच धनंजय मुंडे यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे.
येत्या १७ ऑगस्ट रोजी शरद पवार बीडमध्ये जाहीरसभा घेणार आहेत. या सभेतून शरद पवार आपली भूमिका स्पष्टपणे मांडणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे बीडमध्ये शरद पवार काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शरद पवारांची ही सभा अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्यासाठी असल्याच्या चर्चा देखील सध्या सुरु झाल्या आहेत
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या बीडमधील सभेबाबत विचारलं असता धनंजय मुंडे म्हणाले, “एक गोष्ट लक्षात घ्या, कोण कुणाला कोंडीत पकडतंय, हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा.” बीडमध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री मुंडे यांनी हे विधान केले आहे.
दुसरीकडे, शरद पवारांच्या बीड येथील सभेची अधिक माहिती देताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले, “येत्या १७ तारखेला शरद पवार बीडला जाणार आहेत. त्याठिकाणी एक जाहीरसभा होणार आहे. ही सभा खूप मोठी असेल. बीडनंतर पुण्यातही सभा होईल. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगला संवाद आहे. पण काँग्रेसच्या मनात काही शंका असू शकते. बीड येथील सभेतून शरद पवार अधिक स्पष्टपणे आपली भूमिका मांडतील.