मणिपूर – येथे गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे आणि दिवसेंदिवस तेथील परिस्थिती चिघळत चालली आहे. महिलांवर अत्याचार करून नग्न धिंड काढणाऱ्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी देशभरात खळबळ माजली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली आली आहे. तर यातील इतरांचा शोध सुरू आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्य सरकार देत आहे, मात्र दोन महिन्यांपासून या प्रकरणातील निष्काळजीपणा अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी ज्या चार जणांना अटक केली आहे, त्यात त्या जमावाला दिशा देणार्यांचाही समावेश आहे. यामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेल्या हुरयम हेरदास सिंग (32 वर्ष) याला अटक करण्यात आली आहे. राज्यातील थौबल भागातील रहिवासी असलेले हेरदास गर्दीचे नेतृत्व करताना दिसला.
याशिवाय अन्य तीन आरोपींनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याबद्दल पोलिसांनी फारशी माहिती दिलेली नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, ज्या गटाने गावावर हल्ला केला तो मेईतेई समुदायाचा होता, तर महिला कुकी-नागा समुदायाच्या होत्या. याबाबत पोलिसांनी अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी आरोपीच्या अटकेला दुजोरा दिला असून, ४ मे रोजी घडलेल्या घटनेच्या ७७ दिवसांनंतर या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तेही जेव्हा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामुळे मोठा गोंधळ झाला. नांगपोक सेकमाई पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सामूहिक बलात्कार आणि अपहरणाच्या गुन्ह्यात एकूण 4 जणांना अटक करण्यात आली आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या भागात छापे टाकले, त्यादरम्यान हुरयमला पकडण्यात आले. गावात हुरैमची उपस्थिती लक्षात येताच स्थानिक लोकांनी त्याचे घर पेटवून दिले. चार आरोपींबद्दल बोलायचे झाले तर मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी या कृत्याला जघन्य गुन्हा म्हटले असून या सर्वांना फाशीची शिक्षा देण्याची विनंती केली आहे.
=============================