जेरुसलेम – आमचा देश गाझा ताब्यात घेऊ इच्छित नाही; तिथे प्रशासन करू इच्छित नाही किंवा गाझापट्टी जिंकू इच्छित नाही. तथापि, दहशतवादी हल्ल्याचा धोका असेल आणि गाझामध्ये विश्वासार्ह सैन्याची आवश्यकता असेल, तर इस्रायल गाझाचे रक्षन करण्यास कटीबद्ध असेल, असे प्रतिपादन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केले आहे.
हमाससोबतचे युद्ध संपल्यानंतर गाझाच्या सुरक्षेची जबाबदारी इस्रायल कायमस्वरूपी घेईल, असे बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले होते. एक प्रकारे, गाझा ताब्यात घेण्याची इस्रायलची इच्छा म्हणून याकडे पाहिले जात होते. मात्र, युद्धानंतर इस्रायलने गाझा ताब्यात घेतल्यास त्याला विरोध करू, असे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या विरोधानंतर इस्रायलचा सूरही बदलल्याचे नेतन्याहू यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.
इस्त्रायल-हमास युद्धात अमेरिका इस्त्रायलला उघडपणे पाठिंबा देत आहे, मात्र अलीकडेच एका वक्तव्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गाझावर इस्रायलचा कब्जा करणे ही मोठी चूक असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे नेतन्याहू यांना यु-टर्न घ्यावा लागला आहे.
गाझामध्ये पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे सरकार?
अमेरिकेच्या सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, वेस्ट बॅंकवर राज्य करणाऱ्या पॅलेस्टिनी अथॉरिटी सरकारने लढाईनंतर गाझाचे प्रशासन ताब्यात घ्यावे. अलीकडेच, जेव्हा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी वेस्ट बॅंकला भेट दिली होती, त्यावेळीही पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी गाझामध्ये पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा केली होती. मात्र, महमूद अब्बास यांनी आपल्या ताज्या वक्तव्यात इस्त्रायली रणगाड्यांच्या आधारे गाझामध्ये सरकार स्थापन करणार नसून राजकीय वाटाघाटीच्या आधारे तोडगा काढला पाहिजे, असे म्हटले आहे.