मुंबई : राज्यावर आलेल्या अस्मानी संकटांच्या काळातही राजकारण जोरात सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून आता शिवसेनेतील नेते संतापले आहेत. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
नारायण राणे यांना टोला लगावताना संजय राऊत म्हणाले की, राणे कुठेही गेले तरी, त्यांची ओळख कायम शिवसैनिक म्हणूनच राहणार आहे.
खासदार राऊत पुढे म्हणाले की, संसदेत अनेक खासदार येतात. बऱ्याच खासदारांना कोणी ओळखतही नाहीत. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. शिवसैनिक म्हणून ही ओळख आहे. शिवसेना सोडून गेलेल्या नेत्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. नारायण राणे आमका असे म्हटले जात नाही. तो शिवसैनिक आहे, असेच म्हटले जाते. आमदार आणि खासदार माजी होतात. पण शिवसैनिक कधीच माजी होत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं.
राणे यांनी कोकणात प्रशासकीय अधिकाऱ्यांना बदली करण्याच्या दिलेल्या इशाऱ्यावरून राऊत यांनी टोला लगावला. सत्ता हा मानसिक आधार आहे. सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना गडचिरोलीला पाठवू असा दम देतात, असंही राऊत म्हणाले.