शंकर दुपारगुडे
कोपरगाव – अनेक छोट्या छोट्या गुटखा विक्रेत्यांवर थातुरमातुर कारवाई केली जाते. गुटख्याच्या पाच पंचवीस पिशव्या, पोती पकडून कारवाई दाखविण्यात येते, पण आतापर्यंत कोपरगाव तालुक्यात कधीच कंटेनरवर कारवाई झाली नाही. आजपर्यंत गुटखा विक्रीतील बड्या व्यापाऱ्यांना अन्न औषध प्रशासनाचे बडे अधिकारी का पकडू शकत नाहीत. किंवा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला का सापडत नाहीत. तालुक्यातील एक बडा गुटखाकिंग तीन तालुक्यात गुटखा विक्री करीत असल्याची खुलेआम चर्चा असताना कोळपेवाडीचा बडा व्यापारी कुणाच्या आशीर्वादाने इतकी मोठी गुटखा विक्री करतो.
शासनाने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातलेली असतानाही कोणाच्या आशीर्वादाने व सहकार्याने संपूर्ण राज्यात खुलेआम गुटखा विक्री सुरु आहे. अन्न औषध प्रशासन विभागाची भूमिका कायम संशयास्पद आहे तर पोलिसांची भूमिका विचार करायला लावणारी आहे. एखाद्या गुटखा विक्रेत्याला गुटखा विक्री करताना एकदा पकडल्यानंतर त्याला कोणी कोणी गुटखा पुरवठा केला किंवा त्याने कोणा कोणाला विकला.
याचा शोध लावून संपूर्ण गुटखा विक्रीची पाळेमुळे आजपर्यंत का शोधली जात नाहीत. एकाच व्यापाऱ्यावर जर वारंवार गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल होवूनही तो गुटखा विक्रीचा व्यवसाय पुन्हा पुन्हा करण्याची ताकत त्याला नक्की कोण देतं. कारवाईची भिती वाटण्याऐवजी, कारवाई झाल्यानंतर तो विक्रेता अधिक जोमाने गुटख्याची खुलेआम कसा करु शकतो. म्हणजेच कायद्याचा धाक नसावा किंवा पुन्हा विक्री करण्याची मुभा नकळत मिळत असावी. तालुक्यात आत्तापर्यंत अनेकवेळा गुटखा विक्रेत्यावर थातुरमातुर कारवाई करण्यात आली. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठ्या व्यापाऱ्याला पकडता का आले नाही.
किंवा तो बडा व्यापारी त्यांना का सापडत नाही. सर्व काही आलबेल असताना अचानक जिल्हा पोलीस अधीक्षकांना आपण कर्तव्यदक्ष आहोत, हे दाखविण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली, कि काय असा संशय येतो. बुधवारी पहाटे कोपरगाव शहरातील दोघा गुटखा विक्रेत्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून कारवाई केली. दोन गाड्यासह अंदाजे तीन लाखाचा गुटखा व इतर साहित्य पकडून तिघांना ताब्यात घेतले.
ही कारवाई दोन वेगवेगळ्या ठिकाणाहुन केली. कारवाई केल्याबद्दल त्यांचे कौतुक करावे, तितके कमीच आहे. जे अन्न औषध प्रशासन विभागाने कारवाई करायला हवी होती ते स्थानिक गुन्हे शाखेने केली. स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवले पण पहाटे कारवाई झाल्यानंतरही प्रसिध्दी माध्यमापासून कारवाईची माहीती रात्री साडेसात वाजेपर्यंत दडवून ठेवली जात होती. सविस्तर व योग्य माहीती दिली जात नव्हती. गुटखा विकणारा एक बडा व्यापारी शेजारच्या तीन तालुक्याला गुटखा पुरवठा करतोय.
त्याची वरिष्ठ पातळीवर पोहच असल्याची तालुक्यात चर्चा आहे. मग एखाद्या व्यापाऱ्याची वर्षानुवर्षे खुलेआम चर्चा होत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याला किंवा इतर बड्या अधिकाऱ्यांना हे का दिसत नाही. नवे पोलीस अधीक्षक या गंभीर बाबीत लक्ष घालतील का? गुटखा विक्री करणारे बडे व्यापारी व गुटखा विक्रीला छुपा पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांना लगाम घालणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.