स्वारगेट-कात्रज ‘बीआरटी’ला मुहुर्त कधी?

कोट्यवधींची उधळपट्टी होऊनही मार्ग बंदच : मुख्य रस्त्यावर कोंडी

कात्रज – स्वारगेट ते कात्रज रस्त्यावर उधळपट्टी करून बीआरटी मार्ग बनवण्यात आला. त्यानंतर विविध दुरुस्तींच्या नावाखाली आणखी खर्च करण्यात आला. मात्र, हा मार्ग अजूनही वापरात नसल्याचे चित्र आहे. तर, रेंगाळलेली कामे अजूनही सुरूच आहेत. यामुळे पीएमपी बसेस मुख्य रस्त्यावरून धावत आहेत. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे.

 

 

गेल्या तीन-चार वर्षांपासून या बीआरटी मार्गाचे काम सुरूच आहे. कात्रज ते स्वारगेट या सात किलोमीटरच्या अंतरामध्ये बीआरटीचे नवीन 10 बसस्थानक तयार करण्यात आले. पण, सध्या तरी त्याचा वापर होत नाही. मुख्य मार्गावर अन्य लहान-मोठी वाहने असतात. बीआरटी प्रकल्पामुळे रस्त्याचा मधला भाग व्यापला गेला आहे. पण, यामुळे गैरसोयच अधिक होत आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पीएमपी बसेसचे दरवाजे डाव्या बाजूस आहेत. तर, या मार्गावर असलेले बस स्टॉप हे उजव्या बाजूला आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ होत आहे. बस चालकालादेखील अडचणी सहन कराव्या लागत आहेत.

 

 

हा रस्ता काही ठिकाणी अरुंद असल्याने अनेक अपघातदेखील घडत आहेत. अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कात्रज चौक येथे नव्याने रुंदीकरण करून बस पिकअप पॉइंट करण्यात आला. मात्र, तेथे बसऐवजी रिक्षांचे प्रमाण वाढले आहे. रिक्षाचालकांना येथे स्टॅन्ड दिले नसल्याने तेदेखील बस स्टॉपला गर्दी करत आहे.

 

110 बसेस अन् 450 फेऱ्या

कात्रज ते स्वारगेट मार्गावर दररोज सरासरी 110 बसेस धावत आहेत. या बसेसच्या सर्व मिळून दिवसाला चारशे ते साडेचारशे फेऱ्या होतात. मधल्या उजव्या दरवाज्याच्या बसेसची संख्या कमी आहे. मात्र, त्यांच्या उजव्या बाजूच्या दरवाजाचा वापर अजूनही केला जात नाही. त्यातच हळुहळू आणि टप्प्याने बसेसची संख्या वाढणार आहेत. मात्र, अजूनही बीआरटी मार्ग सुरू न झाल्यास मुख्य मार्गावर मोठा ताण पडणार आहे.

 

 

स्वारगेट ते कात्रज मार्गावर दहा बस स्टॉप करण्यात आले आहेत. त्यांची कामे पूर्ण झाली असून आता फक्त साइन बोर्ड लावण्याचे काम सुरू आहे.

– रविराज तलवार, बीआरटी कन्सल्टंट. पुणे मनपा

स्वारगेट-कात्रज मुख्य रस्त्यावर बीआरटी मार्ग बंद असल्याने पीएमपी बसेस मुख्य रस्त्यावर धावतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. अनलॉकनंतर वाहनांची संख्या वाढली आहे. बीआरटी मार्गावरील सदोष कामामुळे रस्त्याची जागा कमी झालेली दिसते.

– कृष्णा इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.