वाघोली (पुणे) – वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील चव्हाण वस्ती व कवडाळे वस्तीसाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरची गरज आहे. याबाबत दि. 8 जून 2020 रोजी मागणी करण्यात आली आहे. अद्यापही याकडे महावितरण प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे वाडेबोल्हाई येथील ट्रान्सफॉर्मरला मुहूर्त कधी? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे आमदार अशोक पवार यांच्याकडे याबाबत नागरिकांनी तातडीने ट्रान्सफॉर्मरची उपलब्धता करून देण्याची मागणी केली होती. परंतु त्यांनी देखील अधिकाऱ्यांना तातडीने बसवण्यास सांगूनदेखील ट्रान्सफॉर्मरला मुहूर्त मिळालेला नाही.
जवळपास 100 ते 150 नागरिकांसाठी विजेची समस्या वारंवार निर्माण होत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार महावितरणने दि. 8 जून 2020 रोजी वाडेबोल्हाई येथील चव्हाण वस्ती व कवडाळे वस्तीसाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली होती. मात्र ही मागणी करून जवळपास 7 महिन्यांहून अधिक काळ लोटला असून देखील या भागात महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. याबाबत महावितरणचे मुळशी विभागाचे अधिकारी बुंदेले यांच्याशी संपर्क साधला असता येत्या आठवडाभरात ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येईल असे सांगण्यात आले.
<
blockquote>महावितरणच्या ढिसाळ कारभाराचे वाडेबोल्हाई येथील उदाहरण म्हणावे लागेल. हा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर तातडीने बसवला नाही तर दि. 17 मार्च रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-संदीप सातव, संघटन सरचिटणीस, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा