मोरगाव (ता. पुरंदर) – गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक निरा (ता. पुरंदर) येथे राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्र २ ने पकडला आहे. सुमारे ४८० बॉक्स असलेली अवैध दारु व ट्रकसहीत सुमारे एकोण पन्नासलाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन विभागाने ताब्यात घेतला असून आरोपीना ताब्यात घेऊन सासवड कोर्टात हजर केले आहे.
गोवा राज्यात परवानगी असलेली दारु घेऊन जाणारा ( ट्रक क्र एम. एच. १८ ए.ए . ८३५५ ) सातारा रस्त्याने येत असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्र २ ला समजली . यानंतर पुणे विभागाचे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे, व अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गक्रमणाखाली भरारी पथक क्र २ चे दुय्यम निरीक्षण विकास थोरात, एस .के. कानेकर, सतीश ईंगळे, प्रशांत धाईंजे, गणेश नागरगोजे, संतोष गोंदकर, जवान एस बी मांडेकर, नवनाथ पडवळ, केशव वामने, बी. आर. सावंत महीला जवान मनीषा भोसले यांनी सापळा रचला.
पुरंदर निरा गावच्या हद्दीत निरा – लोणंद रस्त्यालगत ट्रक थांबण्याच्या सुचना देण्यात आल्या. ट्रकसोबतच मारुती कंपनीची ईको गाडी क्र जी जे १ के वाय ९८४८ असल्याची ट्रक ड्रायव्हरने सांगितले. ट्र्कची तपासणी केली असता ट्रकमध्ये प्रथम दोनशे लिटरचे मोकळे बॅलर आढळून आले.
अधीक तपासणी केली असता ट्रकमध्ये बॅलरच्या मागील बाजुला रॉयल ब्लॅक व्हीस्की ३० बॉक्स, इम्पेरियल बल्यू व्हीस्कीचे २७५ बॉक्स, ऱॉयल चॅलेंजरचे ५० बॉक्स, ट्युबर्ग स्ट्रॉंग प्रीमिअम बियरचे ७५ बॉक्स, किंग फिशर स्ट्रॉंग प्रीमियमचे ५०० मिली क्षमतेचे ५० बॉक्स असे एकूण ४८० बॉक्स आढळुन आले.
यानंतर राजेश लक्ष्मण लोहार (वय वर्षे ४२ मुं .पो. हिसाळे , जिल्हा धुळे) , सुखविंदरसिंग मलकितसिंग ओजला , (वय वर्षे २५ कर्तापुर , ता. घमेला , जि जालंधर पंजाब), राजु सुरसिंग सोलंकी , (वय वर्षे ३६ रा . गायत्री आश्रम जांभली ता . शेंदवा जि. बडवाणी, मध्यप्रदेश) व शैलेशकुमार रामकृष्ण कौरी (वय २५ वर्षे रा .अहमदाबाद , गुजरात) यांना ताब्यात घेतले. वाहन व मुद्देमालासहीत एकूण ४९०९६०० रुपयांचा मुद्देमाल आरोपींना सासवड न्यायालयात हजर केले आहे. .