पुणे- “करोना प्रतिबंधासाठी 6 ते 11 वयोगटाच्या लसीकरणाचा अजूनही राज्य सरकारकडून आदेश आलेला नाही. त्यामुळे नियोजन महापालिकेला करणे शक्य नाही. या आदेशाची आम्हीही वाट पाहत आहोत,’ अशी माहिती महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.
या वयोगटातील सुमारे 4 लाख 5 हजार मुले शहरात लाभार्थी आहेत. त्यांना कोवॅक्सिन लस देण्याला मागील आठवड्यात केंद्राने जाहीर केले. मात्र अद्याप त्या संदर्भातील आदेश स्थानिक पातळीवर पोहोचले नसल्याने त्याविषयीचे नियोजन या संस्थांना करता आले नाही. शहराची अंदाजित लोकसंख्या 42 लाख आहे. त्यातील 9.68 टक्के लोकसंख्या ही 6 ते 11 वयोगटातील बालकांची आहे. जेव्हा लसीकरणाला सुरूवात होईल तेव्हा महापालिकेच्या केंद्रातून लस देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. देवकर यांनी दिली.
बूस्टर डोस ज्येष्ठांचा प्रतिसाद
शहरात 1 लाख 77 हजार नागरिकांनी तिसरा म्हणजेच बूस्टर डोस घेतला आहे. इतर वयोगटांच्या तुलनेत सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांनी (1.24 लाख) घेतला असून, त्याचे प्रमाण 70 टक्के इतके आहे. सध्या 18 वर्षांपासून पुढील नागरिक ज्यांनी दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत, त्यांना बूस्टर डोस देण्यात येतो. यामध्ये 18 ते 45 वयोगटात 2 हजार 383, 45 ते 60 वयोगटात 9 हजार 686 आणि 60 आणि त्यापुढील वयोगटातील ज्येष्ठांची संख्या 1 लाख 24 हजार आहे.