पिंपरी – विक्रीसाठी ओडिशाहून आणलेला तब्बल 198 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
गोकुळ शिवाजी आगे, अरुण जगन्नाथ मोहिते, ज्ञानेश्वर उत्तम मोहिते या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दीपक शिवराम पवार, रवींद्र उत्तम मोहिते यांचा शोध सुरू आहे. 198 किलो गांजा, चारचाकी वाहन, मोबाइल असा 63 लाख 34 हजार 475 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार, सहायक निरीक्षक प्रशांत महाले, उपनिरीक्षक राजन महाडिक हे चाकण-शिक्रापूर रस्त्यावर गस्त घालत असताना मोहितेवाडी येथे आल्यावर पोलीस अंमलदार संदीप पाटील, मनोज राठोड, अशोक गरगोटे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. एक व्यक्ती चारचाकी आयशर गाडीत गांजा घेऊन शेल पिंपळगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकातील पोलिसांनी दोन टीम करून मोहितेवाडी येथील हॉटेल संतोष समोरील रस्त्यावर सापळा रचून वाहन आणि वाहन चालक गोकुळ आगे याला पकडले. गाडीच्या इंजिनच्या जवळ ताडपत्री टाकून कोणालाही संशय येणार नाही, अशा पद्धतीने गांज्याची 93 पाकिटे लपवलेली आढळून आली. त्यानंतर चौकशीत आगे याने इतर आरोपीची नावे सांगितली. हा गांजा त्यांनी ओडिशामधून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले.
“”गेल्या काही दिवसांत अंमली पदार्थ विक्री, साठवणूक करणाऱ्यांवर मोठ्या कारवाया केल्या आहेत. ओडिशावरून गांजा आपल्याकडे येत आहे. शहरात कुठे अंमलीपदार्थ येतात, कोठून येतात, याची संपूर्ण माहिती काढून कारवाई करण्याचा सूचना दिल्या आहेत.”
– कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त-पिंपरी चिंचवड आयुक्तालय