राजगुरूनगर -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार शनिवारी (दि. 25) राजगुरूनगरात येणार असून ते श्तकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात ते काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
खेड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ आणि खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 25) दुपारी 12. 30 वाजता सहकारमहर्षी साहेबरावजी सातकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या विस्तारित नूतन इमारतीचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते होणार आहे.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. देवेंद्र बुट्टे पाटील यांनी बुधवारी (दि. 22) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, खेड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
याप्रसंगी संस्थेचे संचालक बाळासाहेब सांडभोर, राजेंद्र टाकळकर, सतीश नाईकरे, प्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते. गृहमंत्री दिलीपराव वळसेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार असून
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुणे-नाशिक रस्त्यावरील खरेदी-विक्री संघाच्या पेट्रोल पंपावर सहकारमहर्षी साहेबराव सातकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्यानंतर पाहुणे महाविद्यालयात नूतन इमारतीच्या भूमिपूजनासाठी येणार आहेत. महाविद्यालयातच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.