मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 1 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पुणे दौऱ्याची सुरुवात दगडूशेठ गणपती दर्शनाने केली आहे. त्यांच्या स्वागतासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज जाहीर केला जाणार आहे. मात्र या पुरस्काराचे महत्त्व आणि हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना का दिला जात आहे? याबाबत जाणून घेऊयात…
‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ट्रस्टतर्फे दरवर्षी दिला जातो. 1983 पासून राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार देण्यात येतो.
कृषी, आरोग्य, अर्थ, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मोलाच्या योगदानामुळे पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय त्यांनी देशाला जागतिक पातळीवर मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. या कार्यासाठी पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
यंदाचा पंतप्रधान मोदींना 41 वा लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जाणार आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी, लोकमान्य टिळकांच्या 103 व्या पुण्यतिथीला, टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करणार आहे. या पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे स्वरुप आहे.
यापूर्वी कोणाला मिळाला आहे हा पुरस्कार ?
एस.एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन.आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. कैलासावडिवू सिवन, बाबा कल्याणी, सोनम वांगचुक, डॉ. सायरस पूनावाला यांच्यासह अन्य दिग्गजांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे.
मागील वर्षी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ‘मिसाइल वुमन’ अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वैमानिक प्रणालीच्या महासंचालिका आणि अग्नी-4 व 5′ क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या यशाच्या शिल्पकार डॉ. टेसी थॉमस यांना जाहीर झाला होता.