वॉशिंग्टन : गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक पातळीवरच क्लायमेट चेंज किंवा तापमान वाढीचा विषय जास्त गंभीर बनत चालला आहे. पृथ्वीवरील विविध घटकांना या तापमान वाढीचा फटका बसत असताना आता एका नवीन अभ्यासानुसार पृथ्वीच्या अंतरंगालासुद्धा या क्लायमेट चेंजचा धोका निर्माण झाला आहे.
हवामानातील बदलामुळे आणि तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागल्याने पृथ्वीच्या गाभ्यातही बदल होऊ लागले आहेत. पृथ्वीच्या अंतरंगात असणाऱ्या जमिनीचे प्रसारण पावण्याचे किंवा संकुचित होण्याचे प्रमाण वाढत चालले असून पृथ्वीच्या पृष्ठभागावर जमिनीवर उभारण्यात आलेल्या उंच इमारतींना त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
ज्याप्रकारे तापमान वाढीमुळे पृथ्वीच्या अंतरंगामध्येसुद्धा बदल होत आहेत त्या बदलांना साजेसे असे अभियांत्रिकी बदल करण्याची क्षमता मनुष्यामध्ये आहे की नाही याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. मोठमोठ्या उंच इमारती उभारताना किंवा अंडरग्राउंड बांधकाम करत असताना पृथ्वीच्या अंतरंगातील या बदलाची नोंद घेणे आवश्यक ठरले आहे. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतील काही अभियंत्यांनी याबाबतचे संशोधन केले असून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आणि पृथ्वीच्या अंतरंगातील बदलाचा अभ्यास केला आहे.
तापमान वाढीमुळे पृथ्वीच्या अंतरंगातील जमीन प्रसरण पावत आहे किंवा संकुचित होत आहे त्यामुळे बांधकाम केलेल्या वास्तुंच्या पायालाच धोका पोहोचत आहे. या अभ्यासामध्ये शिकागोमधील उंच इमारतींचा अभ्यास करण्यात आला. या इमारती ज्या पृष्ठभागावर उभारण्यात आल्या आहेत. त्याच्या खालील पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यात आला असता.
अंतरंगातील ही जमीन आठ मिलीमीटरने संकुचित झाल्याचे लक्षात आले काही ठिकाणी अभ्यासानंतर ही गोष्ट लक्षात आली की पृथ्वीच्या अंतरंगातील जमीन काही ठिकाणी बारा मिलिमीटरने प्रसरणही पावली आहे. सशोधकांच्या मते पृथ्वीच्या अंतरंगात जमिनीत होणारे हे बदल अत्यंत धोकादायक आहेत आणि यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे आव्हान पेलण्यासाठी आपले सिविल इंजिनियर्स तयार आहेत की नाहीत याबाबत शंकाही उपस्थित केली जात आहे.