मुंबई – प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून प्रसिद्धीच्या झोतात आले. काही महिन्यांपूर्वी प्रथमेश-मुग्धाने ‘आमचं ठरलंय’ म्हणत सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्यांची सतत चर्चा रंगलेली दिसते. लवकरच प्रथमेश-मुग्धा विवाहबंधनात अडकणार असून त्यापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणार आहे. एका कार्यक्रमात मुग्धा-प्रथमेशने “लग्नाचं योग्य वय कोणतं?” या प्रश्नावर दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
प्रथमेशने मुग्धाला लग्नाच्या योग्य वयाबाबत प्रश्न विचारलेला होता. त्यावर मुग्धा उत्तर देते की, “मला असं वाटतं की, आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करून मुलीचं आणि मुलाचं लग्नाचं वय ठरवलं आहे. पूर्वीच्या काळात लग्न करताना मुलाच्या आणि मुलीच्या वयात जे अंतर असायचं ते 100 टक्के चुकीचं आहे. पण, अमुक-अमुक वयात लग्न झालं पाहिजे यामागे काहीतरी लॉजिक नक्कीच असणार आहे. विशिष्ट वयात लग्न का झालं पाहिजे? यामागची कारण सर्वांनाच माहिती आहेत. ”
“फक्त आपली जनरेशन ती कारणं स्वीकारत नाही. कारण, त्यांना स्वातंत्र्य हवं असतं, उशिरा लग्न करायचं असतं, स्वत:ची स्पेस सोडायची नसते वगैरे वगैरे…आणि यासाठी फक्त वयाला दोष दिला जातो. मला या गोष्टी पटत नाहीत. योग्य वयात योग्य गोष्टी झाल्या पाहिजेत, असे मला वाटते.”
मुग्धाच्या या उत्तराचे अनेकांनी समर्थन केले आहे. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, प्रथमेश आणि मुग्धाने प्रेमाची कबुली दिल्यानंतर चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. परंतु सध्या या जोडीला प्रेक्षकांचेही भरभरून प्रेम मिळत आहे.