नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून त्यांनी भाजप आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीतील जनतेला दिलेल्या मोफत सेवांविरोधात असल्याचा आरोप करताना, ‘हा पैसा आम्ही भ्रष्ट्राचाऱ्यांच्या घशात घालण्याऐवजी सामान्य जनतेच्या कल्याणासाठी वापरला तर त्यात गैर काय?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये ते लिहतात, “भारतीय जनता पक्ष हा वीज, पाणी, शिक्षण, औषधे, बस प्रवास भाडे या सुविधा दिल्लीकरांची मोफत देण्याविरोधात आहे. आमच्या सरकारने भ्रष्ट्राचारात जाणारा पैसा रोखून त्याचा वापर सामान्य दिल्लीकरांसाठी केला आहे.”
“माझा भाजपला एक साधा प्रश्न आहे की, जनतेचे पैसे चोरणे योग्य की त्या पैशांचा योग्य वापर करून दिल्लीकरांना मोफत सुविधा देणं योग्य?” असा प्रश्न देखील मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ता भाजपच्या हाती आल्यास भाजप विद्यमान आम आदमी पक्षाच्या सरकारतर्फे देण्यात आलेल्या सर्व मोफत सुविधा रद्द करेल असा दावा देखील ‘आप’तर्फे करण्यात येत आहे.