मुंबई – गेल्या दहा दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक एकतर्फी वाढून विक्रमी पातळीवर गेले होते. आज सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढ पुरेशा वेगात होत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नफेखोरी होऊन शेअर निर्देशांकात घट नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 263 अंकांनी म्हणजे 0.54 टक्क्यांनी कमी होऊन 48,174 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 53 अंकानी कमी होऊन 14,146 अंकांवर बंद झाला.
सकाळी शेअर बाजार निर्देशांकांत वाढ झाली होती. मात्र दुपारी नफेखोरी वाढल्यानंतर निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले. आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, ऍक्सिस बॅंक, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
मात्र नफेखोरीच्या वातावरणातही पावर ग्रिड, भारती एअरटेल, ओएनजीसी, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. निर्देशांक व उच्च पातळीवर असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे काही गुंतवणूकदार नफा काढून घेत आहेत, असे रिलायन्स सिक्युरिटी विश्लेषक बिनोद जोशी यांनी सांगितले. देशविदेशातील काही अनिश्चितामुळे असा परिणाम होत आहे असे त्यांनी सांगितले.
अमेरिकेतील निवडणुकांचा परिणाम
अमेरिकेत सिनेटमधील बहुमत डेमॉक्रॅटिक पक्षाकडे जाण्याची शक्यता वाढली आहे. तसे झाले तर अमेरिकेतील करांचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता होती. 100 सदस्यांच्या सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे 50 तर डेमोक्रॅटिक पक्षाचे 48 सदस्य होते.
आता झालेल्या दोन जागासाठीच्या निवडणुकात एक जागा डेमॉक्रॅटिक पक्षाने जिंकली आहे व दुसऱ्या जागेवर डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार पुढे आहे.