जेरुसलेम : मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या संरक्षण प्रणालीची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. भारत आणि इस्रायलने हवाई सुरक्षेसाठी ही यंत्रणा संयुक्तपणे विकसित केली आहे. भारतीय सुविधेद्वारे गेल्या आठवड्यात घेतल्या गेलेल्या या चाचणीदरम्यान निकषांची पूर्तता झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे “इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज’ने काल प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
“एमआरएसएएम’ ही यंत्रणा हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीतील आधुनिक यंत्रणा असून याद्वारे अवकाशातील 50-70 किलोमीटर उंचीवरील शत्रूचे विमान पाडले जाऊ शकेल, असे तज्ञांनी म्हटले आहे.
“इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज’ आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात “डीआरडीओ’ने संयुक्तपणे आणि दोन्ही देशातील संरक्षण कंपन्यांबरोबरच्या भागीदारीतून विकसित केलेल्या या प्रणालीचा वापर दोन्ही देशांच्या लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही संरक्षण दलांमध्ये वापर केला जाणार आहे. या प्रणालीमध्ये आधुनिक रडार, कमांड आणि कंट्रोल, मोबाइल लॉंचर, ऍडव्हान्स आरएफ सीकरच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या इंटरसेप्टरचाही समावेश आहे.
एअर डिफेन्स सिस्टममधील प्रत्येक चाचणी अत्यंत गुंतागुंतीची असते आणि कोविड -19 मर्यादेमध्ये या गुंतागुंतीमध्ये लक्षणीय वाढ झाली, असे “आयएआय’चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी बोझ लेव्ही यांनी सांगितले.