पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – घरोघरी गुढी उभारून आणि शोभायात्रेद्वारे नववर्षाचे नागरिकांनी उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. याशिवाय शहरातील छोट्या आणि मोठ्या मंदिरांत फुलांची आरास करण्यात आली होती. नागरिकांनी पाडव्यानिमित्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. घरोघरी लिंबाचा पाला, आंब्याचे ढहाळे, साखरेची गाठी, फुलांच्या हाराने सजलेली गुढी उभारण्यात आली. याशिवाय अनेक संघटनांनी, राजकीय पक्षांनी चौकांमध्ये, समाजमंदिरात सार्वजनिक गुढीही उभारली.
राष्ट्रीय कला अकादमीतर्फे शोभायात्रा
राष्ट्रीय कला अकादमीतर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मध्यवर्ती भागातून ही शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी चौकाचौकांत रांगोळ्या काढून कलाकारांनी स्वागत केले. ज्येष्ठ कलाकार देखील या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
अकादमीचे संचालक मंदार रांजेकर, अतुल सोनावणे, सुनील सोनटक्के, योगेश गोलांडे, राजू डेंभे, अकादमीच्या संचालिका रोमा लांडे, अमर लांडे, गणेश माने, योगेश जाधव, नीलेश टांगळे, अभिजित कुलकर्णी, गणेश ओरसे, अर्जुन बिराजदार, श्रीकांत बिचुकले आदी उपस्थित होते.
हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे मातृशक्ती, शौर्य रथांसह शोभायात्रा
विविध क्षेत्रांत पद्मश्री पुरस्कार मिळविलेल्या महिलांच्या कार्याची महती सांगणारा मातृशक्ती रथ, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा असलेल्या शौर्य रथासह हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा ते श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी शोभायात्रा काढण्यात आली.
या वेळी रा. स्व. संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर, सहसंयोजक अश्विन देवळणकर यांसह माजी महापौर मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, हेमंत रासने, गायत्री खडके, कुणाल टिळक, नवनीत मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष फडतरे, भाऊ रंगारी मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, अमित पळसकर, नीलेश खडके, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे शेखर मुंदडा, सुनील देवधर आदी सहभागी झाले होते.
या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांच्या घराण्यातील अनिल जेधे, राजाभाऊ भिलारे, मारुती गोळे, रुपाली देशपांडे या वंशजांच्या हस्ते ग्रामगुढी उभारण्यात आली. सूत्रसंचालन अमोघ वैद्य याने केले, तर यात्रा प्रमुख म्हणून चैतन्य कुसुरकर, अथर्व दातार व अथर्व पाठक यांनी नियोजन केले.
तुळशीबागेत पवमान अभिषेक
ऐतिहासिक तुळशीबाग श्रीराम मंदिरात श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीविष्णूसहस्रनाम, श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त पठणांसह राम नामाच्या जयघोषात श्रीराम- लक्ष्मण- सीता मूर्तींस पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर मूर्तींना पोशाख आणि दागिने घालण्यात आले.
श्री रामजी संस्थान तुळशीबागतर्फे ९ ते २७ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र ऊर्फ सुहास तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले आदी उपस्थित होते.
सामूहिक गुढीपूजन व सुराज्य शपथग्रहण
गुढी पाडव्यानिमित्त महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे पुणे जिल्ह्यात ५० हून अधिक ठिकाणी सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. या वेळी सर्वांनी एकत्र येऊन सुराज्य स्थापन करण्याची सामूहिक शपथ घेतली. भीमाशंकर, लेण्याद्री देवस्थान, तसेच ओझर देवस्थान आदींचे विश्वस्त, धर्मप्रेमी संबंधित गुढी पूजनाच्या ठिकाणी उपस्थित होते.