वडूज, (प्रतिनिधी) – वडूजमधील रिक्षाचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केले.
रिक्षाचालक आणि प्रतिष्ठित नागरिकांची बैठक वडूज पोलीस ठाण्यात मंगळवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते. खटाव तालुका बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे, नगरसेवक शहाजीराजे गोडसे, विनोद उर्फ बाबा शिंदे उपस्थित होते.
सोनवणे म्हणाले, रिक्षाचालकांनी परवाने घेणे बंधनकारक आहे. रिक्षामधून कोणत्याही अवैध मालाची वाहतूक होऊ नये, याची काळजी घ्यावी. रिक्षाचालकांनी पोलीस मित्र म्हणून काम करावे. कोणतीही चुकीची घटना निदर्शनास आल्यास पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा.
गोपनीय विभागाचे कर्मचारी दर्याबा नरळे म्हणाले, वडूजमधील प्रत्येक रिक्षाचालकावर आमचे लक्ष आहे. चुकीची कामे करणार्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांमधून तक्रारी आल्यास कारवाई निश्चित होणार आहे. यावेळी त्यांनी नियमांची माहिती दिली.