पुणे -राज्य शासनाने लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर, महापालिकेनेही शहरातील लॉकडाऊन वाढविला आहे. त्याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी आदेश काढले आहेत. दरम्यान, मागील लॉकडाऊनचे नियमच या वाढीव लॉकडाऊनमध्ये कायम राहणार असून शहरातील शुक्रवार सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 पर्यंतचा वीकेंड लॉकडाऊन कायम असणार आहे.
महापालिकेकडून शासनाच्या आदेशानुसार, 14 एप्रिल आणि 22 एप्रिल रोजी लॉकडाऊनचे सुधारित आदेश जाहीर केले आहेत. त्यात, पुण्यातही अत्यावश्यक सेवांच्या दुकानांना सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली असून वीकेंड लॉकडाऊन मध्येही केवळ दूध आणि मेडिकल सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, शहरात लॉकडाऊनची अमंलबजावणी सुरू आहे.
या लॉकडाऊनचा परिणाम दिसू लागले असून सात हजारांपर्यंत गेलेली दैनंदिन रुग्णसंख्या 4 हजारांच्या आसपास स्थिरावली आहे. मात्र, त्यानंतर लगेच लॉकडाऊन शिथील केल्यास दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे, राज्यशासनाने राज्यातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, आता महापालिका आयुक्तांनीही शहरात लॉकडाऊनचे सुधारीत आदेश काढले असून पुण्यातही लॉकडाऊन 15 मे पर्यंत कायम ठेवला आहे.
हेच राहणार सुरू…
सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 11 यापूर्वी महापालिकेने मान्यता दिलेल्या अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवांची दुकाने, बॅंका, वित्तीय संस्था तसेच शासनाने मान्यता दिलेली खासगी कार्यालये 15 टक्के क्षमतेने सुरू राहतील, तर शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत केवळ दूध आणि मेडिकलची दुकाने सुरू राहणार आहेत. याव्यतिरिक्त नागरिकांना केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवांसाठीच बाहेर पडता येणार असून, इतर वेळी पूर्ण संचारबंदी असणार आहे.