पुणे – राज्यातील शाळांना 1 मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 2021-22 चे शैक्षणिक वर्ष 14 जूनपासून सुरू करावे लागणार आहे. याबाबतचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
2020-21 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जूनपासून करण्यात आली होती. मात्र, करोनामुळे वर्षभर शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद होती. पहिली ते अकरावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू होते. सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना पास करून पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील विविध संघटनांनी शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. ती मान्य झाली असून त्याबाबतचे परिपत्रक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी जारी केले आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतून उन्हाळी व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार यंदाही सुट्टीबाबतची घोषणा केली आहे. सर्व मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना सुट्ट्या मिळणार आहेत.Summer vacation to schools from today
राज्यात 1 मेपासून ते 13 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी लागू असणार आहे. पुढील शैक्षणिक वर्ष 14 जूनपासून सुरू होणार असल्याने तेव्हापासून शाळा सुरू कराव्या लागणार आहेत. जून महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भातील शाळा मात्र 28 जूनपासून सुरू होतील, असे स्पष्ट केले आहे.
76 दिवसांपेक्षा जास्त सुट्ट्या होणार नाही…
शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेश उत्सव यांसारख्या किंवा नाताळ सणांच्या प्रसंगी ती समायोजन आणि संबंधित जिल्ह्यांच्या शिक्षण अधिकारी यांच्या परवानगीने देण्यात येते. माध्यमिक शाळा संहिता नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे. 2021-22 या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत करोनाची तत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित होतील. ते शिक्षण संचालनालयाकडून निर्गमित करण्यात येणार आहे.