पुणे – शहरात दोन दिवसांपासून हजेरी लावणाऱ्या पावसामुळे सोमवारी विश्रांती घेतली. मात्र, शहराच्या काही भागात ढगाळ वातावरण कायम होते. तर पुढील दोन दिवस शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मागील 24 तासांत कोकण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, कोकण गोव्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
मंगळवारी कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. यासह पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहून, हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता विभागाने वर्तविली आहे.