पुणे – विद्यार्थ्यांनी जी पदवी घेतली त्यावरच अवलंबून राहू नये. शरद पवार यांना मी खूप जवळून पाहतो. ते आजही तरुण पिढीसोबत चालण्याचे प्रयत्न करतात. आपण सगळ्यांनी शरद पवारांप्रमाणे अपडेट राहिले पाहिजे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
आजचा विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडला गेला आहे. तो अभियांत्रिकी, वैद्यकीय, चित्रपट, नाटक, कला, संस्कृती, नवे शोध आदी क्षेत्राबाबत अधिक जागरूक आहे. शिक्षक आणि संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांच्या पुढे राहण्यासाठी नवा दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज आहे. चांगले शिक्षक घडविण्यासाठी ही संस्था उपयुक्त ठरेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
शिक्षण क्षेत्रात वेगाने घडत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अध्यापकांनी नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे असून अध्यापकांना त्यासाठी आवश्यक नवा दृष्टीकोन देण्यास महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था उपयुक्त ठरेल, असंही ते म्हणाले.