एका श्‍वासाची किंमत काय असते, हे आम्ही पाहिले…

नेहरूनगरमधील जम्बो कोविड रुग्णालयातून मिळाला अनुभव

पिंपरी – तुमच्याकडे कितीही पैसा असला तरीही तो तुमचा जीव वाचवू शकत नाही. कोविडमुळे निर्माण झालेल्या कठीण काळात एका श्‍वासाची किंमत काय असते, हे आम्ही खूप जवळून पाहिले. कोविडमुळे पूर्ण उध्वस्त झालेली कुटुंबं आम्ही पाहिली आहेत. रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे समुपदेशन करून त्यांची भीती घालविण्याचे काम केले, असा अनुभव नेहरूनगर येथील जम्बो कोविड रुग्णालयातील व्यवस्थापक व समुपदेशकांनी “दै. प्रभात’शी बोलताना सांगितला.

शहरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर 1 सप्टेंबर 2019 रोजी नेहरूनगर येथे जम्बो कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले होते. जवळपास साडेचार महिने हे रुग्णालय सुरू राहिले. सुरूवातीला येथे 600 रुग्णांवर उपचार सुरू होते. शुक्रवारी हे रुग्णालय बंद करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर, रुग्णालय व्यवस्थापक आणि समुपदेशकांशी संवाद साधला.

रुग्णालयाच्या मुख्य व्यवस्थापिका डॉ. प्रिती व्हिक्‍टर म्हणाल्या, कोविड रुग्णालयामध्ये काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा राहिला. मानवी जीवनाचे महत्त्व किती आहे, हे त्यानिमित्त अधोरेखित झाले. व्यक्तीकडे कितीही पैसा असला तरी व्यक्तीच्या जीवनापेक्षा महत्त्वाचा नाही. एका श्‍वासाची किंमत काय असते, हे आम्हाला कोविडच्या काळात खूप जवळून अनुभवले. प्रत्येकाने आपली जीवनशैली आरोग्यदायी कशी होईल, यावर भर देण्याची गरज आहे.

समुपदेशक प्रमुख महेश निकम म्हणाले, उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांची मानसिक स्थिती खालावलेली होती. कोविड या आजारापेक्षा त्याच्या भीतीनेच रुग्ण खचत होते. त्यांच्या विचारांना सकारात्मक दिशा देण्याचे काम आम्ही केले. त्यांच्या कुटुंबीयांना व्हिडीओ कॉल करून रुग्णासह त्यांच्या नातेवाइकांनाही दिलासा मिळावा, यासाठी प्रयत्न केले.

करोनाबाधित रुग्णांची भीती घालवून त्यांना सामान्य पातळीवर आणण्यावर आमचा भर राहिला. कोविडमुळे निर्माण झालेल्या भीतीतून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा अवधी लागत होता. कोविड हा खूपच महाभयंकर रोग आहे, अशी भीती काही रुग्णांच्या मनात घर करून बसली होती. अशा रुग्णांचे व त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करून त्यांची मानसिकता बदलता आली. ही बाब खूप समाधान देणारी ठरली, असा अनुभव समुपदेशक दत्तात्रय करचे यांनी सांगितला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.