पाहुणेवाडी येथील कार्यक्रमात पोलिसांचा खरपूस समाचार
माळेगाव : पवार साहेब, सुप्रिया आणि मी स्वतः बारामती-पाहुणेवाडी परिसरातील दारूभट्टया बंद करतो. तुम्ही सरकारचा पगार मात्र घ्या, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोलिसांना सुनावले. बारामती तालुक्यातील अवैध धंद्यावरून पवार यांनी पोलिसांना कडक शब्दांत फटकारले.
पाहुणेवाडीत एका उद्घाटनप्रसंगी झालेल्या सभेत अवैध धंद्यासंदर्भात आलेले निवेदन पवार यांनी उपस्थितांपुढे वाचून दाखवले. त्यावेळी पवार यांचा पारा चांगलाच चढला होता. पाहुणेवाडी परिसरातील अवैध व्यवसायावरून पवार हे प्रचंड आक्रमक झाले होते.
निवेदनामध्ये परिसरात दारूभट्ट्यांचे वाढते प्रमाण लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि सार्वजनिक शांततेच्या दृष्टीने घातक ठरत चाललेले आहे. दारूभट्टी बंद झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली होती.
दारूभट्टी आढळल्यास मला टायरमध्ये घाला
पवार म्हणाले की, पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई इतकी आक्रमक करावी की उद्या अजित पवारांची भट्टी असली तरी मलासुद्धा टायरमध्ये घाला. परंतु एकही दारू धंदेवाल्याला सोडू नका. इतक्या आक्रमक भाषेत अजित पवार यांनी पोलीस यंत्रणेला बजावले. पुढच्या वेळेस या परिसरात कार्यक्रमाला आलो, तर लोकांनी मला तुमच्या पोलीस कामगिरीबद्दल सांगयला हवं, अशी अपेक्षा यावेळी पवार यांनी केली.