जिल्हा प्रशासनाच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
पुणे – जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात एकूण 1 हजार 440 होर्डिंग उभारण्यात आलेले असून त्यात केवळ 27 होर्डींग अधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राजकीय पाठबळावर हे होर्डींग बिनदास्तपणे लावले जात आहे. त्यामुळे कारवाईत शिथिलता आली आहे. आता होर्डिंग दुर्घटनेनंतर हा आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे होर्डींगबाजांवर कारवाईचे आव्हान आहे.
कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याने या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. तसेच, ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या होर्डींगचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
या अहवालातून ही बाब समोर आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी दिली. दरम्यान, या अनधिकृत होर्डिंगला नोटीस बजाविण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले.
87 होर्डिंग धोकादायक
जिल्हा परिषदेच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीत 1440 पैकी 1370 होर्डिंगधारकांनी परवानगी घेतलेली नाही. त्याचप्रमाणे स्ट्रक्चरल ऑडिट न झालेल्या होर्डिंगची संख्या 1230 इतकी आहे. धोकादायक असणाऱ्या होर्डिंगची संख्या 87 आहे. त्यामुळे, सर्वात आधी ही धोकादायक होर्डिंग पावसाळ्याच्या तोंडावर काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर आतापर्यंत प्रशासनकडून करण्यात आलेल्या कारवाईत 27 होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
मुळशीत सर्वाधिक
जिल्हा परिषदेच्या अहवालानुसार, इंदापूर, हवेली तसेच वेल्हा तालुक्यांची माहिती संकलती करण्यात आलेली नाही. तर उर्वरित 10 तालुक्यातील ग्रामपंचातीमध्ये सर्वाधिक 382 होर्डिंग मुळशी तालुक्यातील ग्रामपंचातींमध्ये आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर खेड तालुका असून त्या ठिकाणी 220 तर तिसऱ्या क्रमांकावर बारामती तालुका असून त्या ठिकाणी 198 होर्डिंग आहेत. तर सर्वात कमी 27 होर्डिंग आंबेगावमध्ये असून भोरमध्ये 103, दौंड तालुक्यात 60, जुन्नर 43, मावळ तालुक्यात 176, पुरंदर 97 तर शिरूरमध्ये 134 होर्डिंग आहेत.