बुलढाणा : बुलढाण्यात एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यामधील आठ प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी ही भीषण घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातानंतर सुखरुप बाहेर पडलेल्या प्रवाशांनी अपघाताची थरार घटना सांगितली आहे. या बसमध्ये बसलेल्या दोन प्रवाशांनी या अपघाताची आपबीती सांगितली आहे.
नागपूरहून औरंगाबादकडे निघालेला काही प्रवाशांनी घडलेल्या या अपघाताचा थरार सांगितला. प्रवासात असलेल्या प्रवाशांनी ‘आम्ही रात्री जेवण करुन बसमध्ये बसलो होतो. त्यानंतर साधारण अर्ध्या तासाने बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर ही बस पलटी झाली. पलटी झाल्यानंतर लगेच बसने पेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आम्ही 19 आणि 20 नंबरच्या सीटवर बसलो होतो. बस पलटी झाल्यानंतर आम्ही खाली पडलो, त्यानंतर आम्ही बसची वरची खिडकी तोडली आणि त्यातून बाहेर पडल्याचे प्रवाशांनी सांगितले.
बस पलटी झाल्यानंतर लगेच बसला आग लागली. त्यानंतर टायरही फुटल्याची माहिती प्रवाशांनी सांगितली. परत डिझेलच्या टाकीचा मोठा स्फोट झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर लगेच घटनास्थळी पोलीस आले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्यादेखील दाखल झाल्या. पण आग एवढी भयंकर लागली होती की, काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतल्याची माहिती प्रवाशांनी सांगितली.
साधारण रात्री दोन वाजण्याच्या सुमारास या बसचा अपघात झाला. यामध्ये 33 प्रवाशी होते. यातील 25 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर आठ प्रवाशी बचावले आहेत. पलटी झाल्यानंतर बसने पेट घेतला. त्यामुळं आतील प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही, त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बस पलटी झाल्यानंतर टायर फुटल्याची माहिती ड्रायव्हरने दिली आहे. त्यानंतर डीझेल टँकला धडक बसली त्यानंतर टँक फुटल्याने बसने पेट घेतला.
त्यानंतर काचा फोडून काही प्रवासी बाहेर पडल्याचे पोलिसांनी सांगितले. जिथून रस्ता मिळाला तेथून प्रवासी बाहेर पडले. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बसच्या कॅबिनमध्ये दोन ड्रायव्हर होते. त्यातील एक जण झोपला होता. तर दुसरा ड्रायव्हर गाडी चालवत होता. यातील एक ड्रायव्हर बचावला आहे, तर एक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.