Kedar Shinde : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचे ‘महाराष्ट्र शाहीर’ व ‘बाईपण भारी देवा’ हे दोन चित्रपट रिलीज झाले होते. यातील ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. या चित्रपटामुळे केदार शिंदे सर्वत्र चर्चा रंगली. इतकेच काय तर, अमेरिकेतील जगप्रसिद्ध मॅग्झिन फोर्ब्सने केदार शिंदेच्या कामाची दखल घेतली आहे.
‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध अमेरिकेतील मासिकाने नुकतंच काही ठराविक निर्मात्यांबद्दल एक लेख प्रदर्शित केला आहे. यात अॅटली, करण जोहर, सिद्धार्थ आनंद यांच्याबरोबरच मराठमोळ्या केदार शिंदेंवरही लेख प्रदर्शित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यांनी दिली आहे. यात त्यांनी त्या मासिकाच्या पानाचा फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबरच त्यांनी केदार शिंदेंचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
“काल काही ठाऊक नसताना ही माझ्या आयुष्यात घटना घडली. Forbes India magazine मध्ये केदार विषयी लिहून आलं. हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. कुठल्यातरी अनोळखी व्यक्तींनी ही घेतलेली दखल. थोरामोठ्यांच्या मांदियाळीत त्याला पाहीलं. डोळे पाणावले. 27 वर्षे त्याची धडपड पहात आहे. हे सगळं घडलं ते तुम्हा रसिकांच्या प्रेमाने. स्वामी कृपेने त्याची घोडदौड अशीच सुरू राहो. त्यावर तुम्ही सगळ्यांचं प्रेम कायम राहो.. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. श्री स्वामी समर्थ”, असेही त्यांनी यात म्हटले आहे. या लेखात केदार शिंदेंची सिनेसृष्टीतील कामगिरी आणि ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला मिळालेले यश याबद्दल उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, बेला शिंदे यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत केदार शिंदे यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटांसह ‘अगं बाई अरेच्चा!’, ‘जत्रा’, ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केदार शिंदे यांनी केले आहे.