पिंपळे गुरव – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पाणीपुरवठा विभागाचे सुशोभीकरण व निसर्गरम्य वातावरणाचे प्रदर्शन करणारे चित्र रेखाटल्यामुळे नागरिकांचे लक्ष आकर्षित करत आहे. येथील नैसर्गिक वातावरण, झाडे झुडपे, तसेच कार्यालय व पाण्याच्या टाकीवर करण्यात आलेले रंगकाम याची पिंपळे गुरव व शहरात चर्चा सुरू आहे. प्रभागातील नागरिक हा परिसर पाहण्यासाठी येत आहेत.
महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग हा 2008 साली पाऊण एकरात विकसित करण्यात आला. या वेळी टोलेजंग अशा 15 लाख लिटरची एक चौकोनी टाकी आणि 10 लाख लिटरच्या दोन गोल टाक्या अशा 35 लाख लिटर क्षमता असलेल्या तीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत स्मार्ट परिसराबरोबरच येथील पाणी पुरवठा विभागात सुसज्ज कार्यालयीन व्यवस्था, स्वच्छतागृह, सुरक्षा भिंत, त्यावर रंगीबेरंगी पशू व पक्ष्यांची, निसर्गरम्य वातावरणाची चित्रे रेखाटलेली पहावयास मिळत आहेत. दक्षिणेकडे व पश्चिमेकडे भव्य लोखंडी प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नैसर्गिक वातावरणात चर्चा सत्र करण्यासाठी स्मार्ट बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. येथील पाणी पुरवठा विभागात 2 स्टोअर रूम, जनरेटर व्यवस्था, स्वतंत्र सुसज्ज असे पंपिंग रूम आहे. एकूण 120 एचपीचे 4 पंप आहेत. त्यासाठी कंट्रोल पॅनेल व ट्रान्सफॉर्मर लावण्यात आले आहेत.
देशी झाडांमुळे परिसरात थंडावा
पाणीपुरवठा विभागाच्या परिसरात सुरक्षा भिंतीलगत लावण्यात आलेली देशी झाडे, शोभेची, आंब्याची, जांभळाचे, फणसाचे, बेलाची झाडे लावण्यात आली आहेत. तसेच वेली, पाने, फुले यांनी हा परिसर बहरून गेला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याच्या टाक्या व निसर्गरम्य वातावरणामुळे थंडावा जाणवत आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद
पाणी पुरवठा विभागात महापालिकेकडून एक अभियंता, एक कनिष्ठ अभियंता, दोन कर्मचारी नियुक्त केले आहेत. कंत्राटी पद्धतीने 14 वॉल्व्हमन ऑपरेटर, 3 सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. रामनगर, कवडेनगर, विनायक नगर, कृष्णा चौक, एम के हॉटेल, भालेकर नगर, लक्ष्मी नगर, मोरया पार्क, पिंपळे गुरव गावठाण, साठ फुटी रोड कडील भाग, गंगोत्री नगर, शिवराम नगर, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, सह्याद्री कॉलनी, विद्यानगर, ज्ञानेश पार्क आदी भागात 14 ते 15 एमएलडी पाणीपुरवठा वेळेनुसार केला जातो.
पाणीपुरवठा विभागात सलोख्याचे व आनंदी वातावरण राहवे यासाठी परिसराची स्वच्छता करून परिसर सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले. ते पूर्ण करण्यात आले. नामांकित कंपन्यांचे इनलेट, आउटलेट, वॉल्व्ह, एअर वॉल्व्ह बदलण्यात आले. त्यामुळे पाणीगळती रोखण्यास मदत झाली. या परिसरात अमृत योजना व इतर प्रभागांतर्गत कामकाजांमधून पाण्याच्या नलिका व कनेक्शन बदलण्यात आले. तसेच जुन्या लाईन बंद केल्याने अनधिकृत कनेक्शन पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे पुरेसा आणि क्षमतेने नागरिकांना पाणी मिळत आहे.
– राहुल पाटील, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा
मोफत पाणीपुरवठ्याची सुविधा
नागरिकांच्या मागणीनुसार लग्न समारंभ, वाढदिवस, मयत, दशक्रिया विधी, साखरपुडा व इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी परिसरात मोफत पाण्याच्या टॅंकरची सुविधा पुरविण्यात येते. येथील परिसराची स्वच्छता, दुरुस्ती देखभाल वेळोवेळी करण्यात येते. पाण्याच्या टाकीची लेव्हल पट्टी दरवर्षी बदलण्यात येते. महावितरण विभागामार्फत देण्यात येणारी एक्सप्रेस फिडर लाईन (24 तास वीज पुरवठा) मिळविण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.