जलसंपदामंत्री शिवतारे अडचणीत? ‘त्या’ कामातील भ्रष्टाचाराची होणार चौकशी

पुरंदरच्या जलयुक्त शिवार कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश

वाघापूर – राज्यातील जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिल्याने पुरंदरचे आमदार आणि जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री हे अडचणीत येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पुरंदर तालुक्‍यातील जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची माहिती 24 जूनला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात दिली होती. त्यावेळी जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी भ्रष्टाचार झाल्याची कबुलीही दिली होती. मात्र, यावर सभागृहात गोंधळ निर्माण झाल्याने हा प्रश्‍न राखून ठेवला होता.

पुरंदर तालुक्‍यात झालेल्या जलयुक्त शिवार कामातील भ्रष्टाचाराची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येऊ नये, असा अहवाल जलसंधारण विभागास कृषी आयुक्तांनी सादर केली असल्याची गंभीर माहिती आमदार हेमंत टकले यांनी आज समोर आणली. तत्पूर्वी या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत विभागाकडून न करण्याबाबत लोकप्रतिनिधींनी किंवा राज्याच्या मंत्रीमंडळातील सदस्याने कृषी आयुक्तांना लेखी पत्र दिले होते का? असा गंभीर प्रश्‍नही आमदार हेमंत टकले यांनी सभागृहात उपस्थित केला. शिवाय जलयुक्त शिवाराच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लाचलुचपत विभागाकडून न करण्याबाबत जलसंधारण राज्यमंत्र्यांनी कृषी आयुक्तांना लेखी पत्र दिले होते का? असाही सवाल आमदार टकले यांनी सभागृहात उपस्थित करून मंत्री शिवतारे यांच्याकडे निर्देश केले आहेत. पुरंदर तालुक्‍यातील जलयुक्त शिवार योजनेत शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झालेला असल्याने याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडे एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनेही तक्रार केली होती. या अनियमितते प्रकरणी लाचलुचपत विभागाने गुप्त चौकशी करून तक्रारीत तथ्य असल्याचे नमुद केले होते व त्याअनुषंगाने जलसंधारण विभागाकडे उघड चौकशी करण्याची परवानगी मागितली होती. परंतु, जलसंधारण राज्यमंत्री यांच्या लेखी पत्रावरून कृषी आयुक्त यांनी याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याची आवश्‍यकताच नाही, असा अहवाल शासनास पाठवला व जलसंधारण विभागाने परवानगी नाकारली असल्याचा आरोपही आमदार हेमंत टकले यांनी केला आहे.

कृषी आयुक्तांना या प्रकरणाची लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्यात येऊ नये, असे लेखी पत्र देण्याची आवश्‍यकता काय होती? राज्यमंत्र्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुमारे 200 कोटीचा भ्रष्टाचार केला असल्याने ही बाब उघडकीस येऊ नये, म्हणून त्यांनी या चौकशीला विरोध केला होता का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनीही सभागृहात उपस्थित केला. यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी बक्षीस दिलेल्या गावातच भ्रष्टाचार
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर आमदार हेमंत टकले यांनी थेट आरोप केल्यामुळे राज्यमंत्री विजय शिवतारे हे नजीकच्या काळात अडचणीत येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे जलसंधारणात संपूर्ण राज्यात उत्कृष्ट काम झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरंदर तालुक्‍याला एक क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले होते आणि आता त्याच तालुक्‍यात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आल्याने नजीकच्या काळात शिवतारे यांना चांगलाच घाम फुटणार यात शंका नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)