हिंजवडी – पुणे महापालिकेचा सूस येथून स्थलांतरित होणारा कचरा प्रकल्प नांदे-चांदे गावच्या गायरानावर प्रस्तावित केलेला आहे. ग्रामस्थांचा जर या प्रकल्पाला विरोध असेल तर कुठल्याही परिस्थितीत येथे हा कचरा प्रकल्प होऊ देणार नाही, असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
मुळशी तालुक्याच्या गावभेट दौर्यावर आल्या असता येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी नांदे येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्या वेळी प्रशांत रानवडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुळे यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता. या समारंभात त्या बोलत होत्या. यानिमत्ताने जमलेल्या शेकडो महिलांनी हात उंचावून प्रस्तावित कचरा प्रकल्पाला तीव्र विरोध असल्याचे सुळे यांना सांगितले.
या वेळी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडू करंजावणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी सरपंच प्रशांत रानवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर साखरे, नीलेश पाडाळे, नांदेच्या सरपंच निकिता रानवडे, चांदेचे सरपंच अशोक ओव्हाळ, माजी सरपंच बाळासाहेब केदारी, राष्ट्रवादीचे भोर विधानसभा उपाध्यक्ष सुनील जाधव, हिरामण ससार, शेखर रानवडे, प्रसाद खानेकर आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्तें व चांदे नांदे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
चांदे-नांदे येथील ग्रामस्थांनी कचरा प्रकल्प विरोधात उभारलेला लढा हा ग्रामस्थांबरोबर माझाही लढा आहे. वेळ पडली तर ग्रामस्थांबरोबर आंदोलनातही सहभागी होणार असल्याचेही खासदार सुळे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी लवकरच आपण जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पीएमआरडीए आयुक्तांसोबत बैठक घेऊन यावर चर्चा करू. अन्यथा वेळप्रसंगी जन आंदोलन करू. मात्र कुठल्याही परिस्थितीत कचरा प्रकल्प होऊ देणार नाही. या वेळी त्यांनी केंद्रातील अदृश्य शक्ती व राज्यातील महायुतीच्या सरकारवर सडकून टीका केली.