विठूनामात रंगले दुसरे गोल रिंगण

तुकोबांच्या पालखीतील रिंगण सोहळ्याची अश्‍वांच्या दौडीने सांगता


माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले पालखी रथाचे सारथ्य

– नीलकंठ मोहिते

इंदापूर –
आनंदे कीर्तन कथा करी घोष ।
आवडीचा रस प्रेमसुख ।।
मज या आवडे वैष्णवांचा संघ ।
ते नाही लाग कळी काळाचा ।।
तुका म्हणे मन रंगीलसे ठाई ।
माझे तुझ्यापायी पांडुरंगा ।।

जगद्‌गुरू संत तुकोबारायांचा पालखी सोहळा निमगाव केतकीतील मुक्‍काम आटपून भजन, हरिपाठ, गवळणी, सोंगाडी भारुड गायन करीत हे विठुराया तुझ्याच हरिनामात हे सर्व सुख दडले आहे. याचा लाखो लोकांना थेट प्रत्यय देत मालोजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूरनगरीत शुक्रवार (दि. 5) रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई विद्यालयाच्या प्रांगणात रिंगण सोहळ्यासाठी सकाळी साडेअकरा वाजता दाखल झाला. पालखी सोहळा नारायणदास विद्यालयाच्या शामियान्यात दाखल होण्याअगोदर परंपरा राखीत रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात गोल रिंगण हरिनामाच्या जयघोषात पार पडले.

रिंगणस्थळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील, भाग्यश्री पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, नगरसेवक अनिकेत वाघ, इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, गटनेते कैलास पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले, नगरसेवक गजानन गवळी, श्रीधर बाब्रस, भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष माऊली वाघमोडे, सदानंद शिरदाळे, माऊली चवरे, बारामती उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक मधुकर पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सोशल मीडिया प्रमुख हेमा पाटील, युवा क्रांती प्रतिष्ठानचे प्रशांत सिताप, धरमचंद लोढा यांच्यासह मान्यवर, वैष्णव उपस्थित होते.

पायवाटेवर हरिनामाचा जयघोष करीत संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी सोनाई उद्योग समूहाच्या वतीने मोफत सुगंधी दुधाचा आस्वाद घेतला. यावेळी सोनाई दूध संघाच्या वतीने वारकऱ्यांना मोफत सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी पालखी विश्‍वस्तांचे व वारकऱ्यांचे सोनाई परिवाराच्या वतीने स्वागत केले. उताराच्या पायथ्याशी असलेल्या मंगल सिद्धी परिवाराच्या वतीने जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले, व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र तांबिले यांनी सुगंधी दुधाचे मोफत वाटप केले.

इंदापूर शहरात पालखी सोहळ्याने प्रारंभ करणे अगोदर बायपास पूल परिसरात संत गुलाब बाबा भक्‍त मंडळ इंदापूर, माढा, करमाळा यांच्यावतीने अल्पोपहाराची चे वाटप सकाळपासून करण्यात आले. इंदापूर अकलूज बारामती या चौकात इंदापूर शहराच्या वतीने नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी पालखी विश्‍वस्तांचे स्वागत करण्यात आले. रिंगणस्थळी प्रथमतः नगारा आगमन झाला. तदनंतर पालखी रथाचे आगमन झाले. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठलच्या जयघोषात इंदापूरकरांनी पालखीसह वारकऱ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. दिंड्यासोबत वारकऱ्यांनी सांप्रदायिक भजन गात अनेक पावल्या लीलया खेळून दाखवल्या. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पालखी विश्‍वस्तांसह पालखी रथात बसून रिंगण सोहळ्याची पाहणी केल्यानंतर रिंगण पालखीच्या चोपदारांनी लावले.

रिंगण सुरू होताच तुळशीवाल्या भगिनी, विणेकरी, टाळकरी यांनी मुखात हरिनाम घेत अनुक्रमे फेरी केली. मानांच्या अश्‍वांची पूजा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आली. तदनंतर अकलूजच्या मोहिते-पाटील यांचा अश्‍व व बाबुळगाव करांचा अश्‍व या दोन मानाच्या अश्‍वांची पूजा हर्षवर्धन पाटील यांनी केली. अश्‍व रिंगणात धावण्यासाठी सोडण्यात आले. चपळ चित्त्याच्या वेगाने दोन्ही अश्‍व धावत होते.विठ्ठल विठ्ठल विठ्ठलच्या गजरात अश्‍वांनी परिक्रमा पूर्ण करतात रिंगण सोहळ्याची सांगता केली. रिंगण सोहळा संपल्यानंतर पालखी शहरातील नारायणदास रामदास हायस्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या शामियान्यात एक दिवसीय मुक्‍कामासाठी विसावली. शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने सर्व दिंड्यांना अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली.

चरण सेवा हजारो वारकऱ्यांची
संत ज्ञानेश्‍वर महाराज सेवा समिती जिल्हा अकोला यांच्या वतीने संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याला फिरते मोफत वैद्यकीय सेवा पथक यंदाही कार्यरत आहे. यामध्ये 14 डॉक्‍टर्स, 38 स्वयंसेवक यांनी वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांची नेत्रतपासणी, मलमपट्टी, औषधी वितरण व वारकऱ्यांच्या हाता पायाची मालिश करून चरण सेवा दिवसभर इंदापूर शहरात केली. सेवा समितीचे प्रकाश वाघमारे, डॉ. राजकुमार बुले, मलमपट्टी विभागाचे गजानन कतलकार, प्रेमिला डोईफोडे, गोपाल घाटे, गणेश शिंदे, विठ्ठल वाघ,निरंजन बोरडे, डॉ. शिवचरण सिंह ठाकुर यांनी वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी मेहनत घेतली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.