सातारा – जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल राज्य निवडणूक आयोगाने वाजविला आहे. या नगरपालिकांच्या प्रभाग रचनांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना गती मिळाली आहे. सातारा, फलटण, कराड, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर आणि म्हसवड या आठ नगरपालिकांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव दोन मार्च रोजी सादर केला जाणार आहे.
राज्यात मे 2020 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत मुदती संपणाऱ्या राज्यातील 208 नगरपालिकांचा प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकीत द्विसदस्यीय प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. निवडून द्यायच्या किमान व कमाल सदस्यांची सुधारित संख्या यापूर्वीच निश्चित असून नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार राज्य शासन मागासवर्ग आयोगाचे नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आकडेवारी देणार आहे.
ही आकडेवारी तपासून योग्य त्या शिफारशी राज्य शासन व निवडणूक आयोगास करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. याबाबत योग्य निर्णय घेण्यास कालावधी लागण्याची शक्यता आहे. मुदतीमध्ये नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम घेण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत. त्यापूर्वी प्रभागांच्या हद्दी निश्चित करण्यात येणार असून त्यानंतर आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
प्रभागांच्या भौगोलिक समस्या प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना आणि सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. प्रभाग रचना अंतिम करण्याबाबतचे अ वर्ग नगरपालिकांचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत. संबंधित मुख्याधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी ही सर्व प्रक्रिया राबवण्याची असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी या कामासाठी नेमावयाचा आहे. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारी या प्रभाग रचनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. निवडणुकीचे विविध टप्पे नगरपालिकांना संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याची स्पष्ट सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.
नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग रचना आरक्षण तरतुदीनुसार करावे लागणार असून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम त्यानंतर निवडणूक आयोग स्वतंत्रपणे करणार आहे. जिल्ह्यातील आठ नगरपालिकांची मुदत 27 नोव्हेंबर रोजी संपली. सातारा पालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला जाणार आहे. कराड, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर, म्हसवड या नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनांचा प्रस्ताव मुख्याधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नगरपालिकांच्या वेबसाईटवर प्रारुप प्रभाग रचना प्रभाग दर्शक नकाशे दर्शवली जाणार आहे. नागरिकांना दहा मार्चपासून सूचना व हरकती सादर करता येणार आहेत. येत्या महिनाअखेरीस आरक्षण सोडतीचे चित्र स्पष्ट होणार असून अनेक इच्छुकांनी यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.