आळंदी -वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी एक कोटींचा मंजूर निधी अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याने आता लवकरच कामास सुरुवात होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला एक कोटी रुपयांचा निधी वारकरी शिक्षण संस्थेत अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी मंजूर करण्यात आला.
हा निधी काही तांत्रिक कारणामुळे आणि करोनाच्या संकटामुळे मंजुरीसाठी प्रलंबित होता; मात्र उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या निधीस वारकऱ्यांच्या सोयीसाठी असलेली विशेष बाब म्हणून मान्यता दिली व तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ तो निधी सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे वर्ग करून बांधकाम सुरू करण्यास सांगितले आहे. या कामासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विशेष लक्ष दिले.
तर या कामी शांतीब्रह्म हभप मारोतीबाबा कुरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्ष हभप संदीपान शिंदे, सचिव हभप बाजीराव चंदिले आणि खजिनदार भालचंद्र नलावडे यांनी पाठपुरावा केला.