नवी दिल्ली – जागतिक संकेतांनुसार सोन्याच्या दरात आज केवळ पाच रुपयांची घट होऊन सोन्याचा दर 47,153 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 287 रुपयांनी कोसळून 64,453 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,802 डॉलर व चांदीचा दर 24.30 प्रति औस झाला.
यासंदर्भात बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यामध्ये डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात बरीच वाढ झाली आहे. डॉलरचा दर आणखी कमी झाला तर सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान भारतामध्ये दिवाळीचा सण येत असल्यामुळे आगामी काळामध्ये भारतात सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता बऱ्याच विश्लेषकांना वाटते.