सत्यपाल मलिक यांचा आणखी एक राजकीय बॉम्ब; गोव्यातील भाजपप्रणित सरकारवर केले भ्रष्टाचाराचे आरोप

नवी दिल्ली – एकामागोमाग सनसनाटी दावे करणारे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आणखी एक राजकीय बॉम्ब टाकला आहे. त्यांच्या निशाण्यावर आता भाजपचे गोवा सरकार आले आहे. मलिक यांनी गोव्यातील भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे. त्याचा आधार घेऊन विरोधकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना हटवण्याची मागणी केली आहे.

मेघालयचे राज्यपाल बनण्याआधी मलिक यांनी जवळपास वर्षभर गोव्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गोवा सरकारला भ्रष्टाचारावरून लक्ष्य केले.

प्रत्येक बाबीच्या हाताळणीत गोवा सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे. करोना संकटामुळे लॉकडाऊन लागू झाल्यावर गोवा सरकारने अत्यावश्‍यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने खुली ठेवण्यास मनाई केली. मात्र, एका कंपनीला घरोघर विक्रीची परवानगी देण्यात आली. त्या कंपनीकडून त्या सरकारला पैसे देण्यात आले होते. संबंधित प्रकाराची माहिती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दिली. गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानेच मला हटवण्यात आले, असे त्यांनी म्हटले.

मलिक यांच्या मुलाखतीचा संदर्भ घेऊन कॉंग्रेस आणि आपने गोवा सरकारला घेरले. मोदी सरकारने गोव्यातील सावंत सरकार बरखास्त करावे. कुठली कारवाई न करता मोदी भ्रष्ट लोकांचा बचाव करत आहेत. संबंधित प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशाच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली.

तर, आपने मुख्यमंत्री सावंत यांच्या हकालपट्टीची मागणी केली. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालाने मुख्यमंत्र्याचा भ्रष्टाचार उघड करण्याची घटना प्रथमच घडली आहे, असेही त्या पक्षाने म्हटले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.