पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – समाविष्ट गावे आणि नव्याने सुरू झालेल्या आरोग्य वर्धिनी केंद्र यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून ISO प्रमाणपत्र प्राप्त कंपनीकडून २५ हजार ५०० लिटर्स क्षमतेचा वॉक इन कुलर बसविण्यात आला होता. याचे उद्घाटन अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी राज्य शासनाकडील सहायक संचालक आरोग्य सेवा तथा उप राज्य लसीकरण अधिकारी डॉ. प्रवीण वेदपाठक, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपआरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी डॉ राजेश दिघे,
सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रशांत बोठे, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स मेडिकल ऑफिसर डॉ चेतन खाडे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ गोपाल उज्वणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश जगदाळे व डॉ. प्रदीप पवार, लसीकरण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ० ते ५ वयोगटातील मुलांची संख्या सुमारे ३ लाख इतकी असून, त्यांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम अंतर्गत वयाच्या विविध टप्प्यावर वेगवेगळ्या लसी देण्यात येतात. जन्मता बीसीजी, पोलिओ, हॅपाटायटिस बी, त्यानंतर ६, १०, १४ आठवडे पूर्ण केल्यानंतर पेन्टा, पोलिओ, रोटा आयपीव्ही आणि पीसीव्ही, त्यानंतर ९ महिने पूर्ण व १.५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर एमआर,
व्हिटॅमीन-ए, डीपीटी-बी इत्यादी लसी दिल्या जातात. बाळाचे ४.५ वर्ष पूर्ण झाल्यावर पुन्हा डीपीटी, तसेच 10 आणि 16 वर्षांनंतर आणि गरोदर महिलांना टीडी या लसी देण्यात येतात. सदर लसीच्या साठवणीसाठी मुख्य लसीकरण केंद्र नारायण पेठ येथे ५ आय एल आर उपलब्ध आहे. त्यातून पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील ५४ दवाखाने व १९ प्रसूतिगृह यांना लसीचा पुरवठा करण्यात येतो.
आगामी काळात राज्य शासनामार्फत अॅडल्ट बीसीजी, जापनीज इंसिफीलायटीस, एमआर लसीकरण यासारख्या मोहिमा नियोजित आहे. महापालिकेतील नवीन ३४ समाविष्ट गावांमधील मुलांच्या लसीकरणासाठी हे वॉक इन कुलर बसविण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.