पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे आणि परिसराला चित्रकारांची मोठी परंपरा आहे. नवे चित्रकार, शिल्पकार उदयास येत आहेत. मात्र, तुलनेने त्यांचे काम मांडणारी कलादालने (आर्ट गॅलरीज) कमी आहेत, तसेच असलेली कलादालने शहराच्या एकाच भागात केंद्रित झालेली दिसतात, अशी खंत ज्येष्ठ चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने आयोजित पुणे गॅलरी ऑफ व्हिज्युअल आर्टस् या उपक्रमाचे डॉ. पटवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. श्रीराम लागू रंग अवकाश येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रसिद्ध चित्रकार जयंत जोशी आणि दृश्यकला सुधारक आणि ज्येष्ठ चित्रकार प्रा. सुधाकर चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सेंटरचे सचिव राजेश देशमुख, ज्येष्ठ चित्रकार- लेखिका माधुरी पुरंदरे हे देखील या वेळी उपस्थित होते.
दृष्यकलांची साक्षरता वाढावी आणि सातत्याने बदलत्या कलाक्षेत्राचा आस्वाद घेणारा नवा प्रेक्षक तयार व्हावा, यासाठी कलाकृतींच्या देवाणघेवाणीसोबत कलादालनांचेही (आर्ट गॅलरीज) नेटवर्किंग वाढवावे, असा सल्ला डॉ. पटवर्धन यांनी दिला.
कलाकारांसह कलादालनांमध्येही संवाद वाढणे गरजेचे आहे. व्यावहारिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही दृष्टीने हा संवाद वाढावा. त्यातून नवा दृष्यसाक्षर प्रेक्षकही घडेल. कलाकृतींच्या सादरीकरणासोबत येथे कलासंबंधित इतर उपक्रमही घडावेत. येथील प्रदर्शित कलाकृतींवरील निवडक टिपणे प्रसिद्ध करावीत, मध्यवर्ती संकल्पना घेऊन प्रदर्शने मांडावीत, असा सल्लाही पटवर्धन यांनी याप्रसंगी दिला.
या वेळी जोशी, चव्हाण, देशमुख यांचेही भाषण झाले. विक्रम मराठे यांनी आभार मानले. उत्तरार्धात उत्तर पेशवाई काळातील चित्रकार गंगाराम तांबट यांच्यासंबंधीचे दृकश्राव्य सादरीकरण चित्रकार नितीन हडप आणि मकरंद सप्रे यांनी केले.