आघाड्यांच्या आखड्यात समितीच्या निवडी ‘स्थगित’

वाई पालिकेच्या विषय समिती निवडी प्रशासनाच्या कचाट्यात; शहराचा विकास अडचणीच्या फेऱ्यात

वाई  – वाई पालिकेतील जनकल्याण व तीर्थक्षेत्र आघाड्यांच्या राजकीय आखाड्यामुळे विषय समित्यांच्या निवडी प्रशासनाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या तांत्रिक व प्रशासकीय नियमांच्या मुद्द्यांवर पीठासन अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने या निवडींना स्थगिती मिळाली आहे.

पालिकेतील दोन आघाड्यांच्या राजकीय संघर्षात प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे शहराचा विकास अडचणीत आल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. वाईकरांच्या कल्याणासाठी व तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी दक्षिण काशी वाई पालिकेत तीर्थक्षेत्राचे जनकल्याण करणाऱ्या दोन भक्कम राजकीय आघाड्या कार्यरत आहेत.

पालिकेत सत्ता स्थापन झाल्यापासून आजतागायत सत्तेच्या राजकारणापायी दोन्ही पक्षांच्या राजकीय आघाड्यांचे सत्तेच्या खुर्चीसाठी रंगलेले आखाड्याचे फड वाईकरांना वारंवार अनुभवायला मिळात आहेत. गतवेळी सर्व विषय समित्यांच्या निवडींमध्ये राज्यातील सत्तेच्या जोरावर जनकल्याण आघाडीने बाजी मारली होती, तर यावेळी तीर्थक्षेत्र आघाडीने मागील निर्णयाची पुनरावृत्ती करत या निवडी रद्द करून जनकल्याण आघाडीवर शरसंधान साधले आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले याच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी समित्यांच्या निवडीसाठी ऑनलाइन सभा झाली. जनकल्याण आघाडीचावतीने स्वच्छता व आरोग्य समितीसाठी सतीश वैराट, वासंती ढेकाणे, रूपाली वनारसे यांनी तर पाणीपुरवठा समितीसाठी महेंद्र धनवे, सुनीता चक्के, सुमैया इनामदार यांनी अर्ज दाखाल केले होते.

तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्यावतीने प्रियांका डोंगरे, स्मिता हगीर, स्मिता नायकवडी, शीतल शिंदे, भारत खामकर, प्रदीप चोरगे, चरण गायकवाड, किशोर बागुल, राजेश गुरव यांनी अर्ज दाखल केले होते. पालिकांच्या विषय समित्यांच्या निवडीसाठी संबंधित आघाडी व संघटना नोंदणीकृत असणे आवश्‍यक आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडी नोंदणीकृत असूनदेखील त्यांच्याकडे सदस्यसंख्या अपुरी आहे, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ आहे, पण आघाडी नोंदणीकृत नाही. आघाडीची नोंदणी नसल्याने नगरसेवकांच्या निवडीदेखील अपक्ष म्हणून ग्राह्य धरल्या जातात. विषय समित्यांसाठी तीर्थक्षेत्र आघाडीमधील सदस्यांनी दाखल केलेले अर्जही प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी फेटाळले. त्यामुळे समित्यांची निवड होऊ शकली नाही.

नगरपालिका फोटो घ्या

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.