दुचाकीवरील महिलेला डम्परने चिरडले

कवठे – सुरुर-वाई रस्त्यावर कृष्णा नदीवरील भद्रेश्वर पुलाच्या मध्यभागी पुढे दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेल्या डम्परने (एमएच-11-सीएच-3693) धडक दिल्याने दुचाकीवर पतीच्या मागे बसलेल्या सौ. अलका सुरेश सोनावणे (वय 45, रा. ओझर्डे, ता. वाई) या खाली पडल्या.

त्यावेळी डम्परने त्यांना तब्बल 50 फूट फरपटत नेले. या अपघातात सौ. सोनावणे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक डम्पर तेथेच सोडून पळून गेला होता; परंतु वाई पोलिसांनी त्यास नंतर ताब्यात घेतले.

अलका सोनावणे या पतीसमवेत दुचाकीवरून शुक्रवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ओझर्डे येथून वाईला निघाल्या होत्या. त्यांची दुचाकी भद्रेश्वर पुलावर आली असता, ग्रीटने भरलेल्या भरधाव डम्परने दुचाकीला धडक दिली. या अपघाताची फिर्याद सुरेश सोनावणे यांनी वाई पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या अपघाताची माहिती मिळताच सपोनि तेलतुंबडे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक फौजदार कृष्णा पवार, रामदास पवार, धायगुडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डम्पर ताब्यात घेऊन सौ. अलका यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वाई येथे ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

या अपघातामुळे वाई-सुरूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. या अपघातानंतर ओझर्डे येथील ग्रामस्थांनी पुलावर गर्दी केली होती. सौ. सोनावणे यांच्या नातेवाइकांनी आक्रोश केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.