वाघोली – शाळा प्रशासनाने परीक्षेच्या एक दिवस अगोदर फी वसुलीसाठी १० वी चे हॉल तिकीट देण्यास नकार दिल्याने पालकांना मनस्ताप सहन करावा लागला असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाघोलीतील पदाधिकाऱ्यांकडून जेएसपीएम शैक्षणिक संकुलातील प्रॉडीजी पब्लिक शाळेत तोडफोड करण्यात आली आहे. शाळा प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन केबिनच्या काचा फोडण्यात आल्या तसेच खुर्च्या फेकल्या.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेसाठी बसण्यासाठी हॉल तिकीट नसल्याने पालक शाळेत आले होते. जुनी व इतर फी भरल्यानंतरच हॉल तिकीट दिले जाईल अशी भूमिका शाळा घेतल्याने पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मनसेचे वाघोलीतील पदाधिकारी प्रकाश जमधडे व सहकारी शाळेत दाखल झाल्यानंतर त्यांना हॉल तिकीट देण्याबाबत सांगण्यात आले. शाळा प्रशासनाची आडमुठपणाची भूमिका पाहून संतप्त मनसैनिकांनी शाळेच्या ऑफीसमधील केबीनच्या काचा फोडल्या व खुर्च्या फेकल्या.
मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भुमिकेनंतर पालकांनीही त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हॉल तिकीट शाळेने दिले नसल्याने मुलांच्या मानसिकतेवर प्रचंड परिणाम झाला असून परीक्षेच्या अगोदर त्यांच्यावर दबाव निर्माण झाला असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी यावेळी व्यक्त केल्या. तोडफोडीनंतर लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तोडफोडीच्या प्रकरणाबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जात आहे.