नवी दिल्ली – राजस्थानमध्ये कॉंग्रेसला आणखी एका धक्का बसला आहे. चार वेळचे आमदार आणि माजी मंत्री महेंद्रजीत मालवीय यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, अनेक दिवसांपासून ते कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरू होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
महेंद्रजीत मालवीय यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात पक्षप्रवेश केला. तत्पूर्वी, मालवीय यांनी रविवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यानंतर ते आज सकाळी दिल्लीहून जयपूरला आले.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मालवीय म्हणाले, भाजपमध्ये येण्याचे एकमेव कारण म्हणजे वागद भागाचा विकास करणे हा आहे. आदिवासी भागात भाजप आणि मोदींशिवाय कोणीही काम करू शकत नाही. मोदी सरकारची धोरणे आणि कामांमुळे प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तसेच सध्या कॉंग्रेसकडे कोणतीही दूरदृष्टी नाही.
दरम्यान, मालवीय यांची राजकीय कारकीर्द अतिशय रंजक राहिली आहे. ते कॉंग्रेसकडून एकदा खासदारही राहिले आहेत. राजस्थान काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष मालवीय हे दोन वेळा जिल्हाप्रमुख, आमदार आणि कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. याशिवाय त्यांनी आदिवासी काँग्रेस सेलचे कार्याध्यक्ष पदही भूषाविले आहे.