वाघोली: वाघोलीचा पुणे महापालिकेत समावेश झाला असला तरी येथे जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र केसनंद याठिकाणी स्थलांतरित होणार असून याबाबतचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. प्रस्तावाला राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर वाघोली आरोग्य केंद्राचे स्थलांतर होणार आहे.
वाघोलीसह २३ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करण्यात आला असला तरी याठिकाणी असणारी आरोग्य केंद्रे पुणे जिल्हा परिषदेकडूनच चालविली जात आहे. सदरची आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे स्थलांतरित करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर वाघोलीचे आरोग्य केंद्र केसनंद येथे हलविले जाणार असून त्यानुसार उपकेंद्रांची निर्मिती होणार आहे. त्यानंतर महापालिकेकडून वाघोलीतील आरोग्य केंद्र चालविले जाणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागानेदेखील वाघोली आरोग्य केंद्रातील संपूर्ण माहिती याअगोदरच घेतली आहे.
माजी सरपंच मिलिंद हरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोलीतून स्थलांतरित होणारे प्राथमिक आरोग्य केंद्र केसनंद येथे उभारण्यात यावे व याकरिता वनखात्याची एक हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केसनंद ग्रामपंचायतीच्या वतीने काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याचे सरपंच नितीन गावडे यांनी सांगितले.