वाघोली : केसनंद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लोणीकंद वाहतूक विभागाच्या वतीने एका वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सरपंच नितीन गावडे यांनी सांगितले. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले होते.
केसनंद मधील मुख्य चौक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सायंकाळी दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या चौकातून वाघोली रोड, राहू रोड, वाडेगाव रोड तसेच अष्टविनायक महामार्ग जात असल्यामुळे गर्दीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे सायंकाळी वाहतूक पोलिसाची याठिकाणी नेमणूक करावी अशी लेखी मागणी केसनंद ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नितीन गावडे यांनी केसनंद फाटा येथील वाहतूक पोलीस विभागास करण्यात आली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांनी केसनंद येथे एक पोलीस कर्मचारी नियुक्त केला आहे.