वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली येथील बीजेएस महाविद्यालय हॉस्टेल परिसरामध्ये संशयितांची कोरोना तपासणी करण्यासाठी स्वॅब सेंटर सुरु करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.२६) पहिल्याच दिवशी वाघोलीत पॉजिटीव्ह सापडलेल्या एका रुग्णाच्या कुटुंबातील तिघांचे स्वॅब घेण्यात आले.
वाघोली परिसरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. वाघोली परिसरात रुग्ण सापडल्यास त्याच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना तपासणी करण्यासाठी संबंधितांना पुणे शहरामध्ये नायडू किंवा ससून हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येत होते. यामध्ये संशयितांचा वेळ जात होता. स्थानिक लोकप्रतिनिधींनी वाघोलीमध्ये कोरोना तपासणी स्वॅब सेंटर व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता. आरोग्य यंत्रणा देखील यासाठी कार्यरत होती.
वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना स्वॅब घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मंगळवारी (दि.२६) प्रत्यक्षात स्वॅब सेंटर सुरु करण्यात आले आहे. संशयित तिघांचे स्वॅब घेऊन स्वॅबचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही येथे पाठविण्यात आले. याठिकाणी आरोग्य केंद्राचे पाच कर्मचारी असणार असून त्यांना पीपीई सुरक्षा कीट देण्यात आले आहे. संशयित व्यक्तीचा स्वॅब घेतल्यानंतर त्यास रिपोर्ट येईपर्यंत बीजेएसमध्येच ठेवण्यात येणार आहे. वाघोलीसह शिरूर-हवेली तालुक्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
स्वॅब सेंटर उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, सरपंच वसुंधरा उबाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड, डॉ. नागसेन लोखंडे, नोडल अधिकारी बाळासाहेब मखरे व ग्रामस्थ उपस्थित होते.