वडगाव मावळ (वार्ताहर)- वडगाव नगरपंचायतीच्या वतीने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल, पुणे-मुंबई हायवे या ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारला आहे.
शासकीय पातळीवर आरोग्य विभाग आपले कर्तव्य व जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहे. तरीपण आपल्या शहरावर कोणतीही आपत्तीजणक परिस्थिती ओढवू नये याकरिता न्यू इंग्लिश स्कूल येथे पाच वॉर्डमध्ये 20 बेडचा विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. याशिवाय अजून 20 बेडची व्यवस्था मुख्याधिकारी सुवर्णा ओगले व अधिकारी वर्ग यांनी केली आहे. तसेच स्त्री, पुरुष यांच्यासाठी वेगळे कक्ष तसेच शौचालय व स्नानगृह यांची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. या सर्व नियोजन व्यवस्थेची पाहणी नगराध्यक्ष मयूर ढोरे व नगरसेवक यांनी आज केली.
खबरदारी म्हणून मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर इत्यादी आवश्यक सामग्री उपलब्ध करण्यात आली असून, अजून याव्यतिरिक्त काय काय उपाययोजना करता येतील याबाबत मुख्याधिकारी तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
सर्व प्रशासकीय अधिकारी, तसेच कर्मचारी करोना विरोधातील लढाई लढण्यासाठी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहे. याशिवाय वडगाव शहरात करोनाचा प्रसार थांबविण्यासाठी आपण आजपर्यंत तरी यशस्वी होत आहोत. यापुढेही असेच काटेकोर पालन केले तर करोना विरोधात मात करणे आपल्याला सोपे होईल. आपण सर्वांनी वडगाव नगरपंचायत व प्रशासनास वेळोवेळी सहकार्य करावे. तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करावे. याच हेतूने सुरू केलेल्या लॉकडाऊनच्या सकारात्मक प्रतिसादामुळे संसर्ग रोखणे शक्य होईल.