कवठे -वाई तालुक्यातील पाचवड व व्याजवाडी येथे करोना रुग्ण आढळल्याने परिसर हादरला. दोन्ही गावांत प्रशासनाने कडक मोहीम राबवली. व्याजवाडी येथील बाधीत आपल्या कुटुंबासोबत मुंबइतून आल्यापासून घरीच क्वारंटाइन होते. ग्रामपंचायत व दक्षता समितीच्या देखरेखीखाली आरोग्यसेविका, आशा कार्यकर्त्यांकडून त्यांची रोज तपासणी सुरू होती.
यातील 57 वर्षीय बाधितांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांची पत्नी व कुटुंबातील इतर चार सदस्य अशा पाच जणांना आज सकाळी हाय रिस्क म्हणून वाई येथे दाखल केले आहे. बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. योजना तराळ यांच्या पथकाने व्याजवाडी परिसराचे सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्याची माहिती आशा कार्यकर्त्या अर्चना पिसाळ यांनी दिली. पाचवड येथील बाधिताचे कुटुंब पुण्यावरून आले.
ग्रामपंचायत व दक्षता समितीने गावाबाहेर तयार केलेल्या विलगीकरण कक्षात हे कुटुंब दाखल केले होते. बाधित गावीच होता. मात्र, तो पत्नी व मुलींच्या संपर्क सहवासात आला. त्यास त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले होते. त्याचा स्त्रावाचा नमुना पॉझिटिव्ह आल्यानंतर सोमवारी रात्रीपासून पाचवड परिसर हादरला असून तीन तालुक्यांच्या मध्यवर्ती असणारी बाजारपेठ व व्यापारी वर्ग भीतीचे सावटाखाली आला आहे.
बाधितांच्या संपर्कातील चौघांना हायरिस्क म्हणून वाई येथे दाखल केले आहे. दरम्यान, वाई- सातारा या रस्त्यावर असणाऱ्या पाचवड व व्याजवाडी या गावांत रुग्ण सापडल्याने वाई तालुका हादरला आहे. मंगळवारी दुपारी तालुक्याचे तहसीलदार रणजीत भोसले, गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप यादव, डॉ. विकास ठोंबरे, डॉ. गणेश गीते, डॉ. उज्जवला इंगळे, डॉ. आशा निकम, आरोग्य सेवक सोनावणे, सरपंच सौ अर्चना विसापुरे, उपसरपंच अजित शेवाळे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब चव्हाण व दक्षता समितीच्या सदस्यांनी पाहणी करून सूचना केल्या.