कोलकता -श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांना मी नव्हे; तर जनतेनेच करोना एक्स्प्रेस असे नाव दिले, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फेटाळून लावला.
भाजपने मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये व्हर्च्युअल जनसंवाद सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत बोलताना शहा यांनी ममतांवर शाब्दिक हल्ला चढवला. ममतांनी स्थलांतरित मजुरांचा अपमान केला. त्यांच्यासाठी चालवल्या जाणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांचा उल्लेख ममतांनी करोना एक्स्प्रेस अशा शब्दांत केला, असा आरोप शहा यांनी केला. त्यावर येथे पत्रकारांशी बोलताना ममतांनी प्रतिक्रिया दिली.
पश्चिम बंगालमध्ये 11 लाखांहून अधिक स्थलांतरित मजुरांनी घरवापसी केली असल्याचेही त्यांनी नमूद केले. श्रमिक विशेष रेल्वेगाड्या पाठवताना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वेने सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांचे पालन केले नाही. त्यामुळे करोना फैलावाचा धोका वाढला, अशी नाराजी ममतांसह काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली होती. त्याचा संदर्भ घेऊन शहांनी ममतांवर टीकास्त्र सोडले होते.